कर्जत/संतोष पेरणे: कर्जत येथील रुग्णांना हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी नवी मुंबई आणि पनवेल भागात जावे लागते.मात्र रायगड हॉस्पिटलमध्ये हृदयविकार शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णांनी कॅथलॅबचा उपयोग करावा असे आवाहन डॉ संजय तारलेकर यांनी केले आहे.कर्जत तालुक्यातील 65 वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर रायगड हॉस्पिटलमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील डिकसळ येथे असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर म्हणून पुढे येत असलेल्या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे लहान लहान शस्त्रक्रिया या रुग्णालयात दररोज होत असतात.मात्र हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यावर येथील आरोग्य पथकाने त्या रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आनंद झाला आहे.
तालुक्यातील कुंडलज येथील यशवंत राघो चंचे यांना 13 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.त्यानंतर त्यांचे नातेवाईक यांनी यशवंत राघो चंचे यांना तत्काळ कर्जत कल्याण रस्त्यावर असलेल्या रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हृदयविकारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही.तरीदेखील येथील डॉक्टर वर्गावर विश्वास व्यक्त करीत यशवंत राघो चंचे यांच्या नातेवाईक यांनी रायगड हॉस्पिटल येथे दाखल केले.रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आलेला रुग्ण दाखल झाला आहे याची माहिती मिळताच हृदयविकार तज्ञ डॉ संजय तारलेकर यांना पाचारण करण्यात आले.
आपल्या रूम मध्ये विश्रांती घेत असलेले डॉ संजय तारलेकर हे देखील मध्यरात्र उलटून गेली असताना देखील सेवा देण्यासाठी रुग्णालयात पोहचले. त्यानंतर रुग्ण यशवंत राघो चंचे यांना स्टेबल करून त्यांच्या शरीराच्या विविध टेस्ट हॉस्पिटल मध्ये करून घेण्यात आल्या,त्यात यशवंत राघो चंचे यांचे हृदय हे केवळ 20 टक्के काम करीत असल्याचे तपासणी मध्ये निष्पन्न झाले होते.
त्यामुळे वय वर्षे 65 असल्याने रुग्ण यशवंत राघो चंचे हे शस्त्रक्रिया करण्यासाठी फिट आहेत किंवा नाहीत यांची खातरजमा डॉ संजय तारलेकर यांच्या टीम कडून घेण्यात आली.त्यानंतर हृदयविकार रायगड हॉस्पिटल येथे 19 मार्च रोजी यशवंत चंचे वय वर्ष 65 यांच्यावर यशस्वी शास्त्रक्रिया करण्यात आली.त्यावेळी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हृदयरोग विशेषद्य डॉ संजय तारलेकर यांच्या सोबत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही देखील थांबून होते.अतिदक्षता विभागात हृदयविकाराची ही दुसरी शस्त्रक्रिया असून रुग्णालयात कॅथ लॅब सुरू करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याने रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे प्रमुख डॉ नंदकुमार तासगावकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रुग्ण यशवंत राघो चंचे यांच्यावर झालेली ही शस्त्रक्रिया शासनाच्या आरोग्यदायी योजनेचा लाभ देऊन करण्यात आली आहे. रायगड हॉस्पिटल मध्ये बहुसंख्य शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने याचा स्थानिक रुग्णांना खूप मोठा फायदा होत आहे.रुग्णांच्या नातेवाईक यांनी रायगड हॉस्पिटलवर विश्वास दाखवल्याने आता पनवेल नवी मुंबईत नवीन हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यास पर्याय उपलब्ध झाला आहे.
कर्जत तालुक्यातील सर्व पेशंटला बदलापूर अन्यथा पनवेल कडे जावे लागते.मात्र आता कर्जत तालुक्यातील हृदयविकारावर उपचारासाठी खूप मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.रायगड हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया सुरू केली असून इमर्जन्सी एन्जोप्लास्टी केले आहे.रुग्णाचे वय 65 असताना देखील त्यांनी शस्त्रक्रिया दरम्यान आरोग्य पथकाला सहकार्य केल्याने शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात मदत झाली आहे.