कर्जत /संतोष पेरणे : परतीच्या पावसाने फक्त मराठावाडाच नाही तर कोकणभागातील शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे. यंदाच्य़ा मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील कुंभे येथील भाताची शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र त्या भागातील शेती नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना असलेले तेथील ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी तेथे पोहचले नाहीत. शेतकऱ्यांची हि कैफियत किसान क्रांती संघटनेने कर्जत तालुका तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.दरम्यान य्त्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे का केले गेले नाहीत, अशी विचारणा कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना केली आहे.
कर्जत तालुका आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अतिवृष्टीृमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी पंचनामी करण्याचे आदेश शासनाच्या वतीने कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी दिले आहेत. त्यासाठी तालुक्यातील सर्व 210 महसुली गावातील पंचनाम्यांचा तपशील जाहीर केला आहे.तालुक्यातील प्रत्येक गाव आणि आदिवासी वाडी मध्ये एकतर कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक यांची तर काही ठिकाणी महसूल ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मात्र शासनाच्या या आदेशाचे पालन होताना दिसून येत नाहीत अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. नेरळमधील कुंभे गावातील सदानंद शिवराम भोईर शेतकरी यांचे नुकसान झाले असल्याने तलाठी सजा नेरळ येथे जाऊन आपल्या नुकसानीचे सांगितले असता, नाव नंबर लिहून घेतले. त्यानंतर तलाठी यांनी आम्ही येऊन पंचनामे करू असे निरोप दिले. अनेक दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहिली परंतु तलाठी मात्र पंचनामेसाठी आले नाही. यासाठी शेतकरी तलाठी सजा नेरळ येथे जाऊन विचारणा केली असता. तलाठी यांनी उलट उत्तर देत अरे राव्याची भाषा वापरण्यात आली. तसेच आता पंचनामे करून झाले असून सर्व कागदपत्रे आम्ही तहसीलदार यांना सादर केली आहेत. असे सांगण्यात आले.
अशाप्रकारे कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या अशा समस्या असू शकतात. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांची कागदपत्रे ही सादर केली नसती अशा शेतकऱ्यांना तहसीलदार धनंजय जाधव यांनी तलाठी यांना सूचना देऊन राहिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून सादर करण्याचे आदेश द्यावे. आणि तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी यामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.या प्रकरणी किसान क्रांती संघटनेने त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची दखल समाज माध्यमांनी घेतली. त्यांनतर चक्रे फिरली असून कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.