Raigad News: महाडमध्ये अतिवृष्टीनंतर पावसाची विश्रांती! 9 दिवसांत विक्रमी 1,213 मिमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता कायम
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाची उघडीप; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
महाडची वार्षिक पर्जन्यमानाची आकडेवारी लक्षात घेता, आतापर्यंत ५०% पाऊस झाला असून आतापर्यंत झालेला १,५७५ मि.मी. पाऊस हा महत्त्वाचा टप्पा असला तरी आगामी काळात अजूनही नियमित स्वरूपात पाऊस होणे आवश्यक आहे. पोषक असा संतुलित पाऊस पुन्हा कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागून आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे जून अखेरीस यंदा ३५८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने रौद्ररूप धारण करत अवघ्या नऊ दिवसांत १.२१३ मिलिमीटर पाऊस बरसवला. त्यामुळे चालू पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान १,५७५ मि.मी. इतके झाले आहे. एवढ्या अल्प कालावधीत झालेल्या या अतिवृष्टीमुळे महाडला सलग तीन दिवस पूरस्थितीचा सामना करावा लागला.
चार दिवस सुरू असलेल्या पावसाने सावित्री नदीसह तालुक्यातील प्रमुख नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, अनेक गावांमध्ये पाणी शिरले, वाहतुकीवर परिणाम झाला, काही ठिकाणी दरडी कोसळल्या, तर हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये गाळ साचल्याने शेतकऱ्यांपुढे पुन्हा लागवडीचे मोठे आव्हान उभे राहिले,
या अतिवृष्टीनंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने वातावरणात मोठा बदल जाणवू लागला आहे. नदी-नाल्यांची पाणीपातळी कमी झाली असून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. पूरग्रस्त भागात स्वच्छता, पंचनामे आणि दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी पावसाचा हा अचानक झालेला खंड कृषी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय मानला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, अतिवृष्टीइतकाच पावसाचा नियमित आणि सातत्यपूर्ण स्वरूपात होणारा वर्षावही महत्त्वाचा असतो. काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घ खंड पडणे ही स्थिती खरीप हंगामासाठी अनुकूल ठरत नाही. भातशेतीला सातत्याने ओलावा आवश्यक असतो. त्याचबरोबर भूजलपातळी, धरणे, तलाव आणि नैसर्गिक जलस्रोतांची संतुलित भरही नियमित पावसावर अवलंबून असते.






