किंवरा ओढा पुलाबाबतच्या अफवांना पूर्णविराम
दरम्यान, सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रभाग क्रमांक ३ मधील स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराशी तातडीने संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार पर्यायी पुलाचा मार्ग तत्काळ बंद करून ४ जुलैपासून जुन्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.त्यानंतर पुन्हा पाणीपातळी वाढू लागल्याने सुरक्षेचा विचार करून संबंधित कंत्राटदाराने जेसीबीच्या सहाय्याने पर्यायी पुलाच्या एका बाजूचा भराव हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करून दिला. त्यामुळे पाण्याचा दाब कमी झाला आणि जुन्या पुलालाही संभाव्य धोका टळला. महत्त्वाचे म्हणजे पर्यायी पूल वाहून गेलेला नसून, तो सुरक्षेच्या दृष्टीने नियोजनपूर्वक हटविण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळ्यात पुलाचे मुख्य बांधकाम सुरू करणे धोकादायक ठरू शकते, याची कल्पना संबंधित कंत्राटदाराला यापूर्वीच देण्यात आली होती. तसेच पावसाळा संपेपर्यंत पुलाचे काम स्थगित ठेवण्याबाबत वाई नगरपालिकेने भोर सार्वजनिक बांधकाम विभागाशी अधिकृत पत्रव्यवहारही केला आहे.
किंवरा ओढा पुलाचे काम कापूरहोळ–भोर–मांढरदेव–वाई–शहाबाग फाटा या महत्त्वाच्या मार्गांतर्गत दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले असले, तरी विविध कारणांमुळे त्याची गती मंदावली होती. यासाठी फुलेनगर ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा, निवेदने तसेच आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.सध्या अस्तित्वातील जुना पूल अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आहे. याशिवाय जकात नाका ते चौडापाट हा रस्ताही गेल्या दोन वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुलासह रस्त्याचे कामही तातडीने पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक ३ मधील लोकप्रतिनिधींनीही नागरिकांच्या अडचणींबाबत नगरपालिकेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार करून कामाला गती देण्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली.पर्यायी पुलाच्या बांधकामावेळीही नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने व ग्रामस्थांनी कंत्राटदाराला आवश्यक तांत्रिक सूचना दिल्या होत्या. लहान चारचाकी व दुचाकी वाहतुकीस सुरक्षित पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी प्रायोगिक स्वरूपात वाहतूक सुरू करून आवश्यक सुधारणा करण्यासही सांगण्यात आले होते. विद्युत व पाणीपुरवठा लाईन स्थलांतराच्या कामामुळे काही दिवस जुना पूल बंद ठेवावा लागला होता.पावसाळा संपल्यानंतरच जुना पूल पाडून नवीन पुलाच्या कामाला गती देण्यात यावी, अशी भूमिकाही स्थानिक स्तरावर सातत्याने मांडण्यात आली होती.
नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पर्यायी पुलाची पाहणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला असून आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर पुढील काम हाती घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, “पर्यायी पूल वाहून गेला” अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे राजकारण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी की, वाढत्या पाण्याचा फुगवटा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून आरसीसी पाईप्स व भराव जाणीवपूर्वक हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात आला. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना टळली. सदर कामावर वाई नगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सातत्याने लक्ष ठेवून असून, प्रशासकीय पातळीवरही आवश्यक पाठपुरावा सुरू आहे. आता पावसाळा संपताच रखडलेले पुलाचे व रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.






