कर्जत/ संतोष पेरणे : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान या ठिकाणी जाण्यासाठी नॅरोगेजवर चालवली जाणाऱ्या मिनीट्रेनने प्रवास करता यावा यासाठी प्रवाशांची मोठी पसंती असल्याचे दिसून येत आहे.नेरळ येथून माथेरान येथे जाण्यासाठी केवळ दोनच गाड्या असल्याने पर्यटक प्रवासी यांचा हिरमोड असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान,नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन मधून प्रवास करता यावा यासाठी ऑनलाईन तिकिटांची व्यवस्था सुरू करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत असते.
ब्रिटिशांनी शोध लावलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी ब्रिटिश काळात नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन सुरू झाली.१९७२ मध्ये तेथे जाण्यासाठी मिनी ट्रेन हा एकमेव मार्ग होता.नंतर रेल्वेचे कामगारांनी केलेल्या संपामध्ये माथेरान नेरळ घाटरस्ता श्रमदान करून बनविला गेला.मात्र मुंबई पासून जवळचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये जाण्यासाठी नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेनला प्रथम प्राधान्य दिले जाते.सध्या वातावरणात प्रचंड उष्मा असल्याने नेरळ माथेरान मिनीट्रेन मधून माथेरानला जाता यावे यासाठी प्रवासी सकाळ पासून नेरळ स्थानकात येवून थांबलेले दिसून येतात.
नेरळ येथून माथेरान जाण्यासाठी सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी पहिली गाडी तर दुसरी गाडी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी सोडली जाते.या ट्रेन मध्ये प्रवासी वर्गासाठी द्वितीय श्रेणी चे तीन डब्बे तर प्रथम श्रेणीचे एक तसेच सलून डब्बा अशी रचना असते एका मिनी ट्रेन मधून साधारण १०५-१०७ प्रवासी यांना जाण्याची सुविधा आहे.सध्या माथेरान येथील पर्यटन हंगाम असल्याने सकाळ पासून पर्यटक गर्दी करून असतात.सध्याच्या पर्यटन हंगामात कोणताही वार असला तरी सकाळी सहा वाजल्यापासून पर्यटक हे तिकीट मिळविण्यासाठी गर्दी करून असलेले दिसून येत आहेत. त्यामुळे माथेरान येथील पर्यटन हंगामाचे दृष्टीने सुचिन्ह समजले जात आहे. मिनी ट्रेन मधून तिकीट न मिळालेले पर्यटक प्रवासी हे नंतर नेरळ माथेरान घाट रस्ता मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे टॅक्सी मधून प्रवास करीत आहेत.नेरळ माथेरान घाट रस्त्यात २४ तास टॅक्सी सेवा प्रवासी वाहतूक करीत असते.
माथेरान मध्ये ज्यावेळी पर्यटन हंगाम असतो त्यावेळी नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन मधून प्रवास करण्यासाठी पर्यटकांच्या उड्या पडत असतात.त्यामुळे प्रवासी हे अगदी सकाळी गाडीच्या वेळेआधी येवून तिकीट रांगेत उभे असतात.गाडीचे एक तास आधी मिनी ट्रेनची तिकीट विक्रीसाठी तिकीट खिडकीवर उपलब्ध असतात.मात्र मिनी ट्रेन मधून प्रवास करता यावा यासाठी प्रवासी हे सकाळ सहापासून रांगा लावून उभे असतात.दोन्ही मिनी ट्रेन मधून साधारण सव्वा दोनशे प्रवासी यांना प्रवास करता येतो आणि त्यामुळे अन्य प्रवासी यांना मिनी ट्रेनचे टिकीट मिळाले नाही तर ते प्रवासी हिरमुसले होतात.त्यामुळे अशा प्रवासी वर्गाकडून नेरळ माथेरानसाठी आणि माथेरान नेरळ साठी रेल्वे कडून ऑनलाईन तिकिटांची व्यवस्था केली जावी अशी मागणी पुढे येत आहे.
२०१८ पासून नेरळ माथेरान मार्गावरील ऑनलाईन तिकिटांची व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे.त्यात लहान मुलांसापासून वयोवृध्द प्रवासी यांना मिनीट्रेन मधून प्रवास करायचा असतो.त्यामुळे तिकीट मिळाली नाही असे प्रवासी हे शेवटी टॅक्सी सेवेचा लाभ घेवून माथेरान मध्ये पोहचत आहेत. मात्र सध्या नेरळ स्थानकात नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन मधून प्रवास करणेसाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता माथेरान येथील पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे. मिनीट्रेन आणि माथेरान पर्यटन हंगाम हे एक समीकरण असून मिनी ट्रेन साठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असल्याने माथेरान मधील पर्यटन भरभराटीला येऊ लागले असल्याचे सुचिन्ह समजले जात आहे.