कर्जत/संतोष पेरणे : कोकणात पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे. अशातच आता कर्जत तालुक्यातील बिरदोले गावातील 27वर्षीय तरुण रोशन कचरू कालेकर या तरुणाचे अंगावर वीज पडल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला.उल्हास नदी जवळ शेती असल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता.या पुरामध्ये शेतीचे कोणते नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्घटना घडली.
नेरळ कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावाच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते.रात्री सर्वत्र ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला.आज पहाटे सर्वांना जाग आली ती विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट यातून जाग आली.त्यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता.त्यामुळे गावाच्या कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी आपल्या शेतात आल्याने आणि त्यातून शेतीचे किती नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी सात वाजता छत्री घेवून घरातून बाहेर पडला होता. त्यावेळी देखील आकाशात विजा चमकत होत्या आणि ढग गडगडत होते.मात्र तरी देखील शेती पाहण्यासाठी गेलेला रोशन पुन्हा घरी परत आला नाही.सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रोशन कचरू कालेकर या रंगकाम ठेकेदाराकडे काम करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळली.त्या विजेच्या प्रवाहात रोशन त्याच ठिकाणी कोसळला आणि विजेचा झटका इतका प्रचंड होता की त्या विजेच्या झटक्यात जागच्या जागी जीव गेला.
ग्रामस्थांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाणे यांना कळविले.मात्र नेरळ कळंब रस्त्यावरील उल्हास नदीवरील दहीवली पुल पहाटे पासून पायाखालून गेल्याने पोलिसांना तळवडे पुलावरून त्या ठिकाणी पोहचावे लागले.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रोशन कालेकर या तरुणाचा मृतदेह श विच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. कागदोपत्री सर्व कामकाज पंचनामा झाल्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन पूर्ण करण्यात आले.दुपारी तीन वाजता वीज अंगावर पडून मृत झालेल्या तरुणाच्या मृतात्म्यावर बिरदोले गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.या तरुणाचा अद्याप विवाह देखील झालेला नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने परिसरावर आणि पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. निसर्गाकडून घडलेल्या दुर्घटनेत रोशन कालेकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे शासनाने त्या तरुणाच्या कुटुंबाला आपत्कालीन मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.