"राज कपूर! बसं नाम ही काफी है"... बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा; ठाण्यात साकारले “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन”
ठाणे/ स्नेहा काकडे : बॉलीवूडचा सुवर्णकाळ ज्या अभिनेत्याच्या कारकिर्दीच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे असा प्रत्येकाला त्याच्या प्रेमात पाडणारा अभिनेता म्हणजे राज कपूर. राज कपूरचे आजही लाखो चाहते आहेत. बॉवीवूड गाजवणाऱ्या या चॉकलेट हिरोच्या जन्मशताब्दी निमित्ताने ठाणे महानगपालिकेच्या वतीने “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन हा उपक्रम राबविण्यात आला. कला, संस्कृती आणि राजकारणाचा वारसा जपणरं शहर म्हणजे ठाणे. शहराची ही ओळख कायम ठेवण्यासाठी महानगरपालिका विविध कला आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत असते.
संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे महानगर समिती, ठाणे महानगरपालिका, आणि श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन” हा सुंदर उपक्रम साकारला गेला. भारतीय संस्कृतीतील विविध रंगछटा आणि परंपरेचे सौंदर्य या महारांगोळीच्या माध्यमातून उलगडले गेले.यंदा राज कपूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी विशेष रांगोळी साकारण्यात आली, ज्यामधून त्यांच्या अजरामर योगदानाचे दृश्यरूप पाहायला मिळाले.तसेच ठाणे फोटो सर्कल आयोजित छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
गुढीपाडव्याच्या मिरवणुकीतील फोटो आणि आकर्षीत व्यंग चित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.यावेळी रंगोली प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी पितांबरी समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी वाघुले, आमदार संजयजी केळकर, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष अमित वाघचौरे, अंजली गांगल, वृषाली वाघुले, अश्विनी बापट आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचा अभिमान साजरा सदर प्रदर्शन 30 मार्च पर्यंत नागरिकांसाठी खुले आहे, ठाणेकरांनी आवर्जून ह्या उपक्रमाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.