एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाण्याच्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला आहे (फोटो - एक्स)
मुंबई : आज सर्वत्र हिंदूनववर्षाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या मुंबईमधील रॅली जगप्रसिद्ध आहे. ठाणे शहरामध्ये देखील शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले आहेत. पारंपारिक वेशभूषेमध्ये आणि मराठमोठ्या पद्धतीने मोठा जनसमुदाय या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला आहे.
ठाणेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये शोभायात्रा काढण्यात आली आहे. ठाण्यातील या कोपीनेश्वर मंदिराच्या शोभायात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने अनेक हिंदू बांधव शोभायात्रेत अत्यंत उत्साह आणि आनंदात सहभागी झाले आहेत. या शोभायात्रेत विविध संस्कृतीचे दर्शन करणारे चित्ररथ आणि संदेशांचा समावेश आहे. यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा देखील समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक दिग्गज नेते या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि भगवे झेंडे मिरवून ही शोभायात्रा सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या शोभायात्रेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि संस्कृती आणि परंपरा दिसून येत असल्याचे सांगितले. ते बोलले की, “हा जल्लोष हा नववर्षाचा, हिंदू संस्कृतीचा आणि मराठी अस्मितेचा आहे. आपल्या उत्साहाचा हा सण आहे. लहान मुलांपासून अबाल वृद्धापर्यंत सर्वजण सहभागी झाले. पाडव्याच्या या नवीन वर्षाला खूप महत्त्व आहे. देशभरासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात पाडवा साजरा केला जातो,” अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांनी विजयाची गुढी आज उभारली. ही विजयाची गुढी उभारण्याचा हा कार्यक्रम आहे. आपल्या सरकारने देखील तीन महिन्यांपूर्वी विजयाची गुढी उभारली. आणि आता महाराष्ट्रामध्ये विकासाची, समृद्धीची गुढी आहे. लाडक्या बहिणींची, लाडक्या भावांची आणि लाडक्या शेतकऱ्यांची ही गुढी आहे. यंदाची गुढी ही संकल्पनेची आहे. भविष्यामध्ये या राज्यामध्ये आपल्याला विकासाचे पर्व आणायचे आहे ते आणि मागील अडीच वर्षामध्ये जे आणलं आहे ते आता आणखी वेगाने पुढे घेऊन जायचं आहे,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडव्याच्या सणाला व्यक्त केला आहे.
राज्यासह देशभरामध्ये गुढीपाडव्याचा उत्साह आहे. मुंबई, ठाणे, नागपूरसह डोंबिवलीमध्ये शोभायात्रांचा आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठी वेषामध्ये नऊवारी साडी घालून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आहेत. त्याच बरोबर पुण्यातील तांबडी जोगेश्वर या ग्रामदेवतेसमोर गुढी उभारण्यात आली आहे. यावेळी ढोलताशाचे पथक, विविध साहसी खेळ आणि चित्ररथ दाखवण्यात आले आहे. लहान मुलांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून येत आहे. डोंबिवली आणि गिरगावमध्ये बुलेट घेत सहभागी झाले आहेत.