डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरातील विविध विकासकामांचा आज भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी डोंबिवली पूर्वेकडील प्रीमियर ग्राऊंड येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. तर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील हे सुद्धा यावेळी व्यासपीठावर होते.
कार्यक्रमाच्या दरम्यान पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे पाटील यांनी नेमकी शिंदेंना काय विनंती केली असावी ? असा प्रश्न माध्यमांनी राजू पाटील यांना विचारला. यावर पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात येणार असलेल्या 14 गावांबद्दल आणि कल्याण शीळ रोडमध्ये बाधित होत असलेल्या नागरिकांबद्दल निर्णय घेऊन तो आपल्या भाषणात जाहिर करावा अशी विनंती केली. या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आपल्या भाषणात यासंदर्भात घोषणा करून टाकली. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या राजू पाटलांनी सांगितलं आणि शिंदेंनी ऐकलं याचा प्रत्यय आला.
कोणती लोकसभा लढवायची, कशी लढवायाची याचा सर्व निर्णय राज ठाकरे घेतील. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची कशी तयारी आहे याबाबत राज ठाकरे यांनी आढावा घेतला असं पाटील म्हणाले. मात्र कल्याण ग्रामीण मध्ये मनसेची ताकद जास्त आहे असं सांगत मोदी लाटेतही मनसेला चांगलं मतदान झालं होतं असंही ते आवर्जून म्हणाले. कार्यकर्त्यांच राजू दादा म्हणून माझ्याबद्दल एक आपुलकी प्रेम आहे म्हणून त्यांच्याकडून मीखासदार व्हावं अशी इच्छा व्यक्त केली जाते मात्र यासंदर्भात शेवटी पक्ष निर्णय घेईल,अस देखील ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांत राजू पाटील आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे काही कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले. त्यामुळे हे महायुतीत सामील होण्याचे तर संकेत नाही ना? असा प्रश्नही माध्यमांनी पाटील यांना विचारला यावर निवडणूका आल्या की भूमीपूजनांची संख्या वाढते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी जातो, त्यामुळे यातुन कोणी गैर अर्थ काढू नये, असं पाटील म्हणाले
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे बॅनर देखील मनसेकडून लावण्यात आले होते याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, हा कार्यक्रम माझ्या विधानसभा मतदारसंघात होता त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजना पोहचाव्यात आणि या कार्यक्रमाचा प्रचार व्हावा म्हणून बॅनर लावण्यात आले असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं.