संग्रहित फोटो
कोल्हापूर : सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सत्ताधारी मोदक, आमरसासाठी दीड कोटी रुपये खर्च करत आहेत. आणि शेतकरी दीड लाखाच्या कर्जासाठी आत्महत्या करत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी पोटातील सात महिन्याच्या गर्भासहित स्वतःला संपवत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अशा घटनांना सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. गारगोटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
सुरवातीला काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहिद झालेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अजित पवार यांची जिल्हाध्यक्षपदी व बाळासाहेब पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक गुरव, स्वाभिमानी पक्षाध्यक्ष संजय देसाई, तालुकाध्यक्ष मायकल बारदेस्कर, सदाशिव देसाई, बाळासाहेब देसाई, नाना देसाई, विजय फगरे, ए जी देसाई, विश्वास पाटील, दशरथ पाटील, रामचंद्र देसाई, कृष्णा देसाई, भिकाजी गायकवाड, संदीप पाटील, प्रमोद सिद्रुक, दिनकर चांदम, एम बी देसाई, सोपान खतकर, किशोर खोमणे,किरण आरेकर, सतिश मोरसे, इत्यादी स्वाभिमानी कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडू
भूदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबतच्या लढ्यात सहभाग वाढवून, हा लढा अधिक तीव्रतेने लढला पाहिजे. अन्यथा, येथील शेतकरी उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. स्वाभिमानीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडला जाईल, असे आश्वासन शेट्टी यांनी दिले.
एकरकमी एफआरपी बंधनकारक
१९६६ च्या कायद्यानुसार, शेतकऱ्यांना १५ दिवसांत एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना, शेतकरी विरोधी सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे मिळण्यास विलंब होत होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली १५ वर्षे सत्याग्रह व न्यायालयीन संघर्ष करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे शेट्टी यांनी नमूद केले.
कोणीही धक्का लावू शकणार नाही
शेट्टी म्हणाले, भारतीय संविधानाने माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. हा संदेश दिला आहे. धर्माच्या नावाखाली विकृत माणसांनी २८ भारतीय नागरिकांना जीवे मारले आहे. तर काही नागरिकांनी लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. या अमानवी प्रसंगात भारतीय जनतेची एकात्मताही पाहण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाखाली भारताला कितीही नख लावण्याचा प्रयत्न केला. तरी भारताच्या एकात्मतेला कोणीही धक्का लावू शकणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.