दापोली : रामदासभाई (Ramdas Kadam) तुम्ही दुसरी इनिंग सुरू करा थांबू नका, असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळात जी नेते मंडळी होती त्यामध्ये रामदासभाई कदम यांचा समावेश होता. त्यामुळे आता भाई तुम्ही दुसरी इनिंग सुरू व पुन्हा राजकारणात सक्रिय व्हा; आम्ही आपल्या सोबत आहोत, असा सल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर व्यासपीठावरून रामदास कदम यांना दिला.
खेड जामगे येथील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम लिखित ‘जागर कदम वंशाचा’ पुस्तकाचे प्रकाशन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी खेड जामगे येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार गजानन किर्तीकर, शेकापचे जयंत पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याची रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता शिंदे यांनी दिलेला प्रेमाचा सल्ला हा रामदास कदम विरोधकांनाही थेट इशाराच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असून १४ रोजी होणाऱ्या बैठकीलाही उपस्थित राहण्याचा निरोप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
[read_also content=”मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांविरोधात आरोपपत्र दाखल; मर्गज आणि कदमांच्या नावाचाही समावेश https://www.navarashtra.com/maharashtra/chargesheet-filed-against-pravin-darekar-in-mumbai-bank-bogus-labor-case-also-includes-the-name-of-the-path-and-steps-279777.html”]
शिवसेना नेते रामदास कदम यांनी लिहिलेले तिसरे पुस्तक यातून कदम वंशाचा इतिहास नव्या पिढीला समजणार आहे. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या राजकीय सामाजिक कामाचे कौतुक करून त्यांनी राजकीय प्रवाह पासून दूर न जाता पुन्हा नव्याने सक्रिय होऊन दुसऱ्या इनिंगची जोरदार सुरुवात करावी अशा शब्दात शुभेछा दिल्या आहेत.
आजच्या कार्यक्रमात पालकमंत्री अनिल परब यांच्याबरोबर आमदार योगेश कदम यांच्या विरोधात नगरपंचायत निवडणुकीत भूमिका घेतलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही या कार्यक्रमाला खास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दापोली दौऱ्यात आमदार योगेश कदम यांना दिलेला सन्मान व आज एकनाथ शिंदे यांचे भाषण यामुळे आता कदम विरोधक अस्वस्थ झाल्याचे बोलले जात आहे. आज एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनाही तुला पुन्हा प्रचार करावा लागणार नाही असा कायापालट कर तुला जिथे लागतील तिथे विकासकामासाठी पैसे कमी पडणार नाहीत. लोकांनी ज्या अपेक्षेने निवडून दिले त्याला तू उतरला आहेसच, पण भविष्यात तुला प्रचारही करावा लागणार नाही असं काम आपल्याला या मतदारसंघात करायचे आहे, असे सांगत पुन्हा या मतदारसंघाचे आमदार योगेश कदमच असतील असे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे आता पक्षांअंतर्गत विरोधकांना हा एक प्रकारे दिलेला थेट इशाराच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुन्हा दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात ‘मातोश्री’ कडून आमदार योगेश कदम यांना आशीर्वाद देण्यात आल्याच बोलले जात आहे.
विधान परिषदेत उमेदवारी नाकारण्यात आली तेव्हापासूनच शिवसेनेचे नेते रामदास कदम फारसे सक्रिय नाहीत. त्यातच काही महिन्यांपूर्वी दापोली मंडणगड नगरपंचायतीत पालकमंत्री अनिल परब यांनी आमदार योगेश कदम यांना शह देत रामदास कदम यांचे पंख छाटण्याचे केलेले प्रयत्न व त्यावरून अनिल परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनी घेतलेली थेट भूमिका अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली. मात्र यात वादाचा फायदा येथील राजकरणात फायदा राष्ट्रवादीलाच झाला.
यानंतर चार दिवसांपूर्वी चिपळूण येथील बैठकीत शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री बदला अशी केलेली मागणी, तसेच एका तरुण नगरसेविकेने आपल्यावर झालेल्या अन्यायाला पक्षाच्या बैठकीत फोडलेली वाचा, यामुळे आता या सगळ्या विषयाची शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने दखल घेतल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे सध्या रामदास कदम विरोधक अस्वस्थ असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
सरकारला धारेवर धरायचं असेल तेव्हा ढीगभर पुराव्यांच्या फाईल घेऊन येत असत. नियमांचा अभ्यास करत सरकारला जाब विचारत हे आम्ही पाहिले आहे. पुराव्यांशिवाय ते कधी सभागृहात बोलत नसत हे आम्ही पहिले आहे, अनुभवले आहे, अशी आठवण गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी यावेळी सांगितली. ‘रामदासभाई तुम्ही पुन्हा वरच्या सभागृहात या’ असा प्रेमाचा सल्लाही थेट व्यासपीठावरून शंभुराजे देसाई यांनी रामदासभाई यांना दिला.
जागर कदम वंशाचा पुस्तक प्रकाशन व धर्मवीर आनंद दिघे यांचा सिनेमा प्रकाशन हा एक योगायोग आहे. जागर कदम वंशाचा हे पुस्तक महाराष्ट्रातील १२ हजाराहून अधिक ग्रंथालयात ठेवण्यात येईल. योगेश कदम यांनी तर माझ्या गावाकडील २५ वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम अवघ्या ३ वर्षात करून आपल्या प्रभावीशाली कार्याची चुणूक दाखवली. २००४ ते २००९ मध्ये शिवसेना आमदारांची वज्रमूठ बांधण्याचे काम रामदासभाई कदम यांनी केले. शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी टाकल्यावर शिवसेना आमदारांनी एकत्र वज्रमूठ बांधल्याचे काम करून विधीमंडळात ठसा उमटविला.
जागर कदम वंशाचा या रामदासभाई कदम लिखित पुस्तक हे समाजाला दिशा देणारे आहे . तर इतिहासाचा ठेवा ठेवणारा आहे, असे सांगून रामदास कदम हे कांदिवलीचे शाखाप्रमुख ते विरोधी पक्षनेते याचा प्रवास देखील तडफदार आणि हृदयात ठसा उमटविणारा आहे. ते शिवसेनाप्रमुखांच्या विश्वासातील सहकारी शिवसेना नेते आहेत. आपल्या ३५ वर्षांच्या कारर्दीतील भरीव संघटनात्मक काम केले आहे. कांदीवलीमध्ये पहिले शिवसेनेचे शाखाप्रमुख होय.
शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी जागर कदम वंशाचा या पुस्तकाचे लेखन करून आपल्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा पैलू साहित्यामध्ये उमटविला आहे . विधीमंडळात तर आपल्या अभ्यासूवृत्तीचा ठसा उमटविला आहे . सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे तर विधीमंडळात प्रभावीपणे आपल्या वक्तृत्वाने ठसा उमटविला असल्याचे म्हटले. या सोहळ्याचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक संजय मोदी यांनी केले.