पाटस : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीचा निकाल लागला. कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. धंगेकर 11 हजार 040 मतांनी विजयी झाले आहेत. या सामान्य माणसाने 28 वर्षांची बलाढ्य सत्ता उलथवून टाकली. त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कसबा पेठ पोटनिवडणूक निकालाची उत्कंठा, सतत बदलत जाणारे मताधिक्य, कधी कमी, कधी जास्त असूनही जो माणूस निर्विकारपणे, शांतपणे कार्यकर्त्यात होता. मिसळीवर ताव मारत होता आणि आपण निवडून आलोय असे छातीठोकपणे सांगत होता. त्या सामान्य माणसाचे नाव म्हणजे रविंद्र धंगेकर. धंगेकर निवडून आले, त्यांनी मोठा इतिहास घडवला. त्यांचा विजय म्हणजे आपला विजय असे गल्लीबोळातली बायाबापडी, तरुण पोरं सांगत होती. त्या धंगेकरांच्या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये तर होतच होता. मात्र, दौंड तालुक्यातील एका गावात भंडाऱ्याची उधळण झाल्यानंतर या जल्लोषाला एक वेगळीच किनार जडली.
धंगेकर यांचे कुटुंब मूळचे दौंड तालुक्यातील
धंगेकर यांचे कुटुंब मूळचे दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी (पिंपळगाव) गावचे. आणखी एक विशेष म्हणजे धंगेकर यांचे आधीचे आडनाव हे झाडगे असून, त्यांचे वडील हेमराज हे पुण्यात धंगेकर कुटुंबाला दत्तक गेले आणि त्यांचे नाव धंगेकर पडले. धंगेकर यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आजही नाथाचीवाडी गावात असून, तेथेच दुमजली एक शेतघरही आहे. आज गावातील ग्रमस्थांनी आपला वाघ निवडून आला असे म्हणत भंडाऱ्याची उधळण केली आणि धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.