संग्रहित फोटो
कोरेगाव : गेले काही दिवसापासून जरंडेश्वर कारखान्याची मळी मिश्रित रासायनिक पाणी जांभूळ ओढा मार्गे तीळगंगा नदीत येत असल्यामुळे कुमठे, आसरे, कोरेगाव गावातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. पंचगंगेच्या पाण्यामुळे शिराळा तालुक्यात वाढलेल्या कॅन्सर पेशंटची रुग्ण संख्या पाहता दूषित पाण्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोत खराब झाले तर कॅन्सरचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे. याबाबत कुमठेचे सरपंच यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असल्याचे सांगितले.
मागच्या आठवड्यात कारखाना परिक्षेत्रात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चार-पाच दिवसांपासून तीळ गंगा नदी पात्रात मळीमिश्रित पाणी येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. सोमवारी सकाळी तिळगंगा नदीतील पात्रात मिसळलेल्या दूषित पाण्याचा फेस वाहत्या पाण्यात जास्त प्रमाणात दिसून आला. कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतकरी, जनावरे व नागरिक यांचे खूपच हाल होत आहेत. कारखान्यापासून वाहत असलेल्या जांभूळओढा पात्रात जवळपास २० पेक्षा जास्त अधिक विहिरी आहेत. धुणे भांडी, जनावरांचे पाणी, शेतीचे पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची परवड होण्याची शक्यता आहे. तीळ गंगा नदी काठावरील बहुसंख्य विहिरी, बोअरवेलमध्ये रासायनिक पाणी झिरपणार असून यामुळे कॅन्सर सारख्या भयानक रोगाला सर्वसामान्य जनता बळी पडणार आहे.
जलचर प्राणी मृत्यूमुखी
दूषित पाणी तीळगंगा नदी पात्रात आल्याने मोठ्या प्रमाणात जलचर प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करणे काळाची गरज आहे. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई होण्याची भीती आहे. तरी लवकरात लवकर दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष
तीळगंगा नदीतील दूषित पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीच्या पात्रात जात आहे. हेच दूषित पाणी कमी अधिक प्रमाणात पुन्हा नळावाटे कोरेगावकरांच्या घराघरात जाणार आहे. यापूर्वीही जागरुक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासन व प्रदूषण विभागाचा राजकीय वरदहस्त असल्याने कारखान्यावर कोणतीही कारवाही हाेत नसल्याचा आराेप हाेत आहे.