सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार आणि ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक चुकांमुळे सामान्य नागरिकांना कसा मनस्ताप सहन करावा लागतो, याचे जिवंत उदाहरण सातारा जिल्ह्यात समोर आले आहे. महाराष्ट्रात रीतसर नोंदणी असलेल्या एका ‘बुलेट’ दुचाकीचा नंबर चक्क कर्नाटक राज्यातील एका ‘चारचाकी’ गाडीला बहाल करण्यात आला आहे. आरटीओच्या या अजब कारभारामुळे पाचगणी येथील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक अनिल बोधे यांना गेल्या पाच वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असून, न्यायासाठी त्यांनी आता थेट पंतप्रधानांच्या दरबारात धाव घेतली आहे.
पाचगणी येथील अनिल बोधे यांच्या मालकीची BLM 5683 या क्रमांकाची बुलेट गाडी आहे. ही गाडी अनेक वर्षांपासून त्यांच्या वापरात असून सर्व कागदपत्रे वैध आहेत. २०२० साली आरटीओच्या नियमावलीनुसार गाडीचे ‘री-पासिंग’ करणे आवश्यक होते. त्यासाठी बोधे यांनी गाडीची डागडुजी करून खर्च केला आणि ते सातारा आरटीओ कार्यालयात पोहोचले. मात्र, ऑनलाईन प्रक्रिया सुरू असताना अधिकारी आणि बोधे यांना मोठा धक्का बसला. बोधे यांच्या बुलेटचा नंबर हा सिस्टीममध्ये कर्नाटक येथील महेश शेट्टी नावाच्या व्यक्तीच्या चारचाकी गाडीला (Car) दर्शवत होता.
एकाच नंबरवर दोन वेगवेगळ्या राज्यांत दोन वाहने कशी असू शकतात? हा तांत्रिक घोळ कोणी केला? असे प्रश्न विचारत बोधे यांनी सातारा आरटीओ कार्यालयाचे उंबरे झिजवले. मात्र, गेल्या चार वर्षात यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. उलट, हक्काच्या गाडीचे पासिंग रखडल्याने आणि कायदेशीर पेच निर्माण झाल्याने बोधे हतबल झाले आहेत. “माझ्या चालू गाडीचा नंबर कर्नाटकात गेलाच कसा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अनिल बोधे यांनी आता व्यापक लढा सुरू केला आहे. त्यांनी केवळ सातारा आरटीओ किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातच नव्हे, तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्तांना लेखी निवेदने पाठवून दाद मागितली आहे. आरटीओ कार्यालयातील ज्या चुकीच्या अधिकाऱ्यांमुळे हा गोंधळ झाला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि आपल्या गाडीचा हक्काचा नंबर परत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. डिजिटल इंडियाच्या युगात प्रशासकीय यंत्रणेच्या अशा चुकांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.
”जर भविष्यात कर्नाटकातील त्या संबंधित चारचाकी गाडीचा अपघात झाला किंवा त्या वाहनाकडून कोणतीही देशविघातक अथवा गुन्हेगारी घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण?” असा अत्यंत रास्त आणि गंभीर प्रश्न अनिल बोधे यांनी उपस्थित केला आहे. एकाच नंबरच्या दोन गाड्या रस्त्यावर असणे ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक असून, या प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे.
2004 साली ज्या चार चाकी पासिंग संपलेल्या कर्नाटकतील गाडीला महाराष्ट्रातील चालू असणाऱ्या दुचाकी गाडीचा नंबर देता येतो का? आणि महाराष्ट्रातील कुठल्या अधिकाऱ्याने हा प्रताप केला हे ही उघड होणे गरजेचे आहे. आणि अनिल बोधे यांना न्याय मिळणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शेवटी, जर मला न्याय मिळाला नाही तर मात्र मी प्रसंगी उपोषण करणार असल्याचे बोधे यांनी सांगितले.






