फोटो सौजन्य - Social Media
सावन वैश्य, नवी मुंबई :- साहिल चौगुले प्रकरणावरून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पीडित महिला राहत असलेल्या भाड्याच्या घराच्या मालकावर महिलेला घर खाली करण्यासाठी पोलिसांकडून दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला होता. मात्र, संबंधित घरमालक मंगेश पांडुरंग साळेकर यांनी व्हिडिओद्वारे हे आरोप फेटाळून लावत पोलिसांकडून कोणताही दबाव आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दत्तनगर येथील ज्योतिर्लिंग अपार्टमेंटमध्ये सहा फ्लॅट्सचे मालक असलेले मंगेश साळेकर यांनी सांगितले की, संबंधित भाडेकरू अद्याप त्यांच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. भाडेकरार आणि पोलीस पडताळणी (एनओसी) पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी त्यांनी वारंवार केली आहे. मात्र, भाडेकरूंकडून अद्याप आवश्यक कागदपत्रे प्राप्त झालेली नसल्याने त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
साळेकर यांनी पुढे स्पष्ट केले की, संबंधित फ्लॅट एजंटच्या माध्यमातून भाड्याने देण्यात आला असून भाडेकरूंशी त्यांचा थेट संपर्क झालेला नाही. तसेच, महिलेला घर खाली करण्यास सांगावे किंवा त्यासाठी दबाव आणावा, असा कोणताही फोन किंवा सूचना रबाळे पोलिसांकडून अथवा अन्य कोणाकडून मिळालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…
दरम्यान, विधान परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांनंतर घरमालकाच्या या स्पष्टीकरणामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोप आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साहिल चौगुले प्रकरणाचा तपास रबाळे पोलीस करत असून, पुरावे संकलित करणे, संबंधितांचे जबाब नोंदविणे आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नसल्याचे मत कायदे जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच, सभागृहात मांडण्यात येणाऱ्या आरोपांना वस्तुनिष्ठ पुराव्यांचा आधार असणे आवश्यक असल्याचीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.






