जुईनगर : राज्यात मराठा समाज आरक्षण सुरू असताना आता धनगर समाजानेही आंदोलनाची ठिणगी टाकली आहे. सरकारने ५० दिवसाचे आश्वासन देऊनही धनगर आरक्षण अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे समाज संतप्त झाला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आता लढाई सुरू केली आहे. त्याकरिता सकल धनगर समाज, नवी मुंबई यांच्या वतीने शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी कोकणभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोकण आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
सकल धनगर समाज, नवी मुंबई यांच्या वतीने आज कोकण आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व महादेव अर्जुन, भास्कर यमगर, मल्लिकार्जुन पुजारी, डॉ.सखाराम गारळे, रावसाहेब बुधे, प्रा.नारायण खर्जे, तुषार धायगुडे, उद्धव गावडे यांनी केले. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमुद केल्यानुसार धनगर समाजाला आरक्षण दिले असे असताना ‘धनगड’ या चुकीच्या उल्लेखामुळे ‘धनगर’ समाज गेले ६५ वर्ष आरक्षणापासून वंचित आहे. २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो असे आश्वासन दिले होते. त्यावेळी दरवर्षी १००० कोटी निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला १३ जीआर निघाले. पण अद्याप ठोस निर्णय पदरी पडलेला नसल्याचे भास्कर यमगर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तर सत्ताधारी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे उपोषणा दरम्यान सरकारने ५० दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ५० दिवस पूर्ण होत असताना देखील सरकारने अजूनही कोणतेही पाऊल उचललेले नाहीत. आता सरकार धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्याच्या तयारीत आहे. याला धनगर समाजाने विरोध दर्शवला आहे. ही समिती म्हणजे वेळ काढूपणा आहे. त्यामुळे आता समिती नको, धनगर आरक्षण अंमलबजावणी करा अशी मागणी आमची असल्याचे महादेव अर्जुन यांनी बोलताना सांगितले. यावेळी भास्कर यमगर यांनी धनगर आरक्षण गीत प्रकाशित केले.
प्रारंभी, सदर धडक मोर्चा खारघर येथून घोषणा देत सायन पनवेल महामार्गावर वरून निघाला. सीबीडी येथे आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी उज्ज्वला गलांडे, स्नेहल खांडेकर यासह विविध समाज बांधवांनी आपल्या भाषणात जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. सभेनंतर कोकण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोकण उपायुक्त अजित साखरे याना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने समाज बांधव मोर्चात उपस्थित होते.






