File Photo : Crime
सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. तरीसुद्धा काही कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या मद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. असाच एक प्रकार जळगावमध्ये घडला आहे.शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या बनावट देशीदारू कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्धवस्त करण्यात आला आहे. तर या कारखान्यातून ५० लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ जणांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी भागात असलेल्या के-१० परिसरातील एका आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीमध्ये शीतपेयांच्या नावाखाली बनावट देशी दारू बनवून ती बाजारामध्ये विकली जात आहे. बनावट दारू विकली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीत जाऊन छापा टाकला. संशयितांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दार आतमधून बंद केले. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी बंद करून घेण्यात आलेले दार तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि बनावट देशी दारूचा कारखाना जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या कारखान्यातून ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दारू पॅकिंगसाठी लागणाऱ्या बाटल्या, 32 बॅरेल तयार असलेली दारू, मशीनरी सामान आणि इतर ५ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारखान्यामध्ये जवळपास ८० लाखाचा मुद्देमाल होता. हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कंपनीची जाऊन पाहणी केली. तसेच त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली बनावट दारू आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या ठिकाणी गेली आहे याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.