Teacher strike: शाळा बंद आंदोलन: राज्यातील २,५३९ शाळा बंद, २४,५४५ शिक्षक अनुपस्थित
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीचा अहवाल संकलित केला असून, त्यानुसार राज्यातील तब्बल २ हजार ५३९ शाळा बंद राहिल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. तसेच, १३ हजार २१६ शिक्षक विनापरवानगी अनुपस्थित राहिले, तर ११ हजार ३२९ शिक्षक गैरहजर असल्याची नोंद आहे. एकूण २४ हजार ५४५ शिक्षक आंदोलनामुळे शाळांमध्ये हजर नसल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने ४ डिसेंबर रोजी सर्व शिक्षण अधिकारी, उपसंचालक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्पष्ट सूचना दिल्या होत्या. आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, ५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा नियमितपणे सुरू राहाव्यात, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
यासोबतच, विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या किंवा संपात सहभागी होऊन शालेय कामकाजात अडथळा आणणाऱ्या शिक्षकांवर ‘काम नाही, वेतन नाही’ या तत्त्वानुसार तसेच नियमांनुसार शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता. त्या दिवशी सुरू असलेल्या शाळांची संख्या, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती-अनुपस्थिती याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.
शिक्षण विभागाने राज्यात २४ हजार ४९० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून, या शाळांमध्ये सुमारे २ लाख २४ हजार ३६६ शिक्षक कार्यरत आहेत. आंदोलनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिक्षक गैरहजर राहिल्यामुळे शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आणि हजारो विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन खोळंबले.






