मुंबई : गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांपैकी काही जण आमच्याही संपर्कात आहेत. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते कायम आहेत. त्यामुळे ते आमदार लवकरच परत येतील असा विश्वास शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. परंतु, कोण आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. ही बैठक असल्यामुळे अनेक आमदार आणि अधिकाऱ्यांची आज मंत्रालयात वर्दळ होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीपक केसरकर हे ही गुवाहाटीला गेले आहेत. तर, जिल्ह्यातील दुसरे आमदार वैभव नाईक हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आज वैभव नाईक मंत्रालयात आले असता पत्रकारांनी त्यांना विचारले असता, मी शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले आहेत. त्यांना पुन्हा परत या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सातत्याने ते हे आवाहन करत आहेत. तिकडे गेलेले आमदार यांच्यासोबत आम्ही विधानभवनात एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशीही आमचेही काही संबंध आहेत. त्यामुळे ते आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नक्कीच परत येतील असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.