'तुमचा वर्धापन दिन आज...', शिवसेनेने व्यंगचित्रातून ठाकरे गटाची उडवली खिल्ली (फोटो सौजन्य-X)
ShivSena Vardhapan Din In Marathi : शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांकडून आज (19 जून) वर्धापन दिन साजरा केला जात आहे. याचदरम्यान, शिवसेनेचा आजचा ५९ वा वर्धापन दिन भव्य मेळावा वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडणार आहे. तर, ठाकरे गटही आज वर्धापन दिन साजरा करत असल्याचे समजते आहे. याचीच शिवसेनेने व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. कारण, खऱ्या शिवसेनेचे नेतृत्व मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. तर, उबाठा गटाची स्थापना १० ऑक्टोबर २०२२ रोजी झाल्याचे या व्यंगचित्रात अधोरेखित करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाची सध्या जोरदार तयारी असून आज राज्यभरातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मुंबईत येणार आहेत. त्यामुळे वरळीतील एनएससीआय डोम येथे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आजच्याच दिवशी उबाठा गटाने वर्धापन दिन साजरा करणार असल्याचे समजत असल्याने त्यांचे शिल्लक कार्यकर्ते गोंधळात पडले आहे. कारण, त्यांच्या गटाची स्थापना २०२२ मध्ये झाली असून त्याला उणीपुरी दोनच वर्षे झाली आहेत. याच मुद्द्यावर शिवसेनेने आपल्या व्यंगचित्रातून मार्मिक टिपण्णी केली आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वर्धापनदिनावरून गोंधळात पडल्याचे दाखवण्यात आले आहेत. तसेच, विकीपीडियावरील उबाठा गटाच्या स्थापनेचे चित्रही यात जोडण्यात आले आहे. शिवसेनेच्या मुख्य सोशल मीडिया पेजेसवर हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहे.
तसेच आजच्या वर्धापन दिनी एकनाथ शिंदे मुंबई महापालिका निवडणुकीवर बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीची घोषणा करणार का? हे देखील पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. याचदरम्यान आजच्या मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक टीझर प्रदर्शित करण्यात आला असून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईत ठाकरेच… असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर झळकवण्यात आले तर भगवा शिवरायांचा आणि बाळासाहेबांचा असे शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.