शिंदे गटाकडून खिल्ली उडविणारा बॅनर
कल्याण- शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक ,नागरिक विशेषकरुन शाळकरी विद्यार्थी त्रस्त आहेत. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. एकीकडे मेट्रोचे काम दुसरीकडे काही प्रमाणात रस्त्याचे काम आणि पलावा पुलाचे देखील काम सुरू आहे. या कामांमुळे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे कल्याण-शीळ रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. दीड दीड तास वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकून पडतात. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण शीळ रस्त्यावर पुलाचा बाजूला एक भला मोठा बॅनर लावला आहे. हा बॅनर आज म्हणजे 1 एप्रिल रोजी लावण्यात आला असून 1 एप्रिलला लोक एप्रिल फूल करुन अनेकांची खिल्ली उडवितात. याच बॅनरला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटातील राजेश मोरे यांच्याकडून राजू पाटील यांची खिल्ली उडविणारा बॅनर लावण्यात आला आहे.
पलावा पूलासंदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण शीळ रस्त्यावर उपहासात्मक बॅनर लावल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने सोशल मिडियाच्या माध्यमातून मनसेचे माजी आमदारांची खिल्ली उडविणारी पोस्ट व्हायरल केली आहे. ज्यामध्ये 1 एप्रिल रोजी राजू पाटील हे आमदारांची शपथ घेणार. त्यांच्या शपथ विधीला जगभरातील राष्ट्रीय अध्यक्ष कल्याणमध्ये येत असल्याचे लिहिले आहे. मात्र १ एप्रिलच्या दिवशी एकमेकांची खिल्ली उडवित नेत्यांनी एकमेकांवर एप्रिल फुल करणारी राजकीय टिका केली आहे. राजेश मोरे यांच्या या टीकेनंतर राजू पाटील यांनी संजय निरुपम यांच्या एक जुना व्हिडिओ टाकत आमदार झाल्यानंतर तुमच्या जोडीने संजय निरुपम यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये संजय निरुप यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मात्र नागरीकांची समस्या ज्या पूलाने सूटणार आहे. तो पूल कधी तयार होणार याचे उत्तर आत्ता न कोणी अधिकारी देत आहे. ना कोणी नेता देत आहे. हा सवाल आत्ता उपस्थित होत आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन येथे सुरु असलेल्या सुरु असलेल्या दोन पलावा पूलासंदर्भात मनेसे नेते राजू पाटील यांनी एक बॅनर लावला. या बॅनरवर लिहीले होते की, कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन ३१ एप्रिल रोजी होणार आहे. संथ गतीने सुरु असलेल्या पूलासंदर्भात लिहून प्रशासन आणि सत्ताधारी यांना लक्ष्य केले होते. यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना एक्स करीत सवाल उपस्थित केला होता.
यानंतर हा बॅनर प्रसार माध्यमांसह सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी फेसबूकवर एक बॅनर टाकले आहे. जो बॅनर शिवसेना कल्याण ग्रामीणच्या वतीने व्हायरल केला आहे. राजू पाटील यांची आमदारपदी निवड. मनसेच्या शॅडो मध्ये निर्णय, शपथ विधीसाठी ट्रम्प यांच्यासह पुतीन किंग जॉग कल्याणला येणार. शपथ विधी दिनांक व स्थल उजव्या कोपऱ्यात पहा असे म्हटले आहे. ते क्लिक केल्यावर एप्रिल फूल असे येते.
या एप्रिल फूलवरुन पूलाच्या कामाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राजेश मोरे यांच्या टीकेला उत्तर देत मनसे आमदार नेते राजू पाटील यांनी संजय निरपम यांच्या एक जुना व्हिडिओ टाकला आहे ज्यामध्ये संजय निरपम यांनी म्हटलं होतं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं पाहिजे की एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत. आमदार झाल्यानंतर मोरे साहेब तुमच्या जोडीने संजय निरुपम विरोधात आंदोलन करणार राजू पाटील यांनी लिहिले आहे. अनेक वर्षापासून सुरु असलेल्या पूलाचे काम लवकर मार्गी लागले पाहिजे. नागरीकांना दिलासा मिळाला पाहिजे.वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे. नेते एकमेकांना एप्रिलफूल करणे चूकीचे नाही. मात्र नागरीकांसोबत एप्रिल फूल होऊ नये अशी चर्चा आत्ता राजकीय वर्तुळात रंगली आहे.