संग्रहित फोटो
मुंबई : जूनचा शेवटचा आठवडा तोंडावर असतानाही अद्याप राज्यात मान्सून (Monsoon) सक्रिय झालेला नाही. यामुळं खरीप हंगाम अडचणीत आलेला आहे. शेतकरी पावसाची (Rain) वाट पाहत असून अद्यापर्ंत केवळ २ टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. धुळवाफ पेरण्यांच्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट असल्याचं सांगण्यात येतंय. पाऊसच नसल्यानं खरीप पेरण्या पूर्णपणे खोळंबण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.
२३ जुलैला राज्यात सक्रिय होणार मान्सून
राज्यात खरीप हंगामात सुमारे १५० लाख हेक्टरवर लागवड होते. यातल्या केवळ ९० हजार हेक्टरवर आत्तापर्यंत लागवड झालेली आहे. अनेक ठिकाणी धूळवाफ पेरण्या झालेल्या आहेत, त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. पाऊस लांबल्यास कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात घट होणार आहे. मान्सून अद्याप तळकोकणातही दाखल झालेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात २३ जुलैला पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.
विदर्भात कापूस , सोयाबिन संकटात
जूनच्या दुसऱ्या आठवड्याच विदर्भात पेरणी सुरु होते. कापूस हे महत्त्वाचं पिक या ठिकाणी घेण्यात येतं. पाऊस नसल्यानं अद्याप खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही.
मराठवाड्य़ातही प्रतीक्षा
पंधरा दिवसांत मृगाचे दोन पाऊस झाले आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेशी ओल झालेली नाही. मराठवाड्यात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अद्याप १ ते २ टक्केच पेरण्या झालेल्या आहेत.
उ. महाराष्ट्रातही चिंता
नाशिकसह उ. महाराष्ट्रात खरिपाची पेरणी रखडलेली आहे. धुळे, नंदूरबारमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
राज्यातील पाणीसाठ्यात मोठी घट
यंदा कमी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मान्सून रखडलेला आहे. उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. यात राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठी झपाट्यानं कमी होताना दिसतोय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के पाणीसाठा कमी आहे. राज्यातील ५६ प्रमुख धरणांतील पाणीसाठा तळाला गेलेला आहे. राज्यात २७५४ गावांत पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.