Status In Support Of Halgam Attack Bajrang Dal Aggressive Tension In Solapur
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटसः बजरंग दल आक्रमक,सोलापुरात तणाव
अजहर असिफ शेख असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील आहे. त्याच्यावर पहलगाम हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याचा आरोप आहे
सोलापूर: पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असताना सोलापूर येथील एका तरुणाने आपल्या व्हॉट्सएपवर या हल्ल्याचे समर्थन करणारे स्टेटस ठेवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीच्या आधारवर सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणावर प्रक्षोभक कृत्य अन् सामाजिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, अजहर असिफ शेख असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील आहे. त्याच्यावर पहलगाम हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याचा आरोप आहे. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने पोलिस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
यासंबंधी तक्रारदार लक्ष्मण बबन साखरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी राजुरी येथे घरी असताना माझा मित्र नागेश पंडीत वाळूजकर (रा. शेलगाव वांगी ता. करमाळा) याने मला सांगितले की, शेलगाव वांगी येथील कुणीतरी व्यक्तीने हिंदू समाजाच्या भावना भडकावणारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आहे. त्यानुसार आज 25 एप्रिल रोजी सकाळी 8.45 वा. माझ्या मोबाईलवर सदर स्टेटसचा फोटो मी नागेश वाळूजकर याच्याकडून मागवून घेतला. त्यानंतर मी त्या स्टेटसची पाहणी केली. त्यात अजहर असिफ शेख नामक तरुणाने आपल्या व्हॉट्सएप स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर ठेवून सामाजिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
आरोपी तरुणाने आपल्या सोशल मीडियाच्या व्हॉट्सएप अकाउंटवर काश्मीरमधील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या समर्थनार्थ समाजात तेढ व तणाव होईल असा मजकूर/स्टोरी ठेवून दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरोधात चिथावणी दिली. तसेच जनतेमध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली. त्यामुळे विहिंप, बजरंग दलाचे लक्ष्मण बबन साखरे यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. हा हल्ला 2008 नंतर भारतातील सर्वात भीषण नागरी हल्ला मानला जात आहे. पाच दहशतवाद्यांनी AK-47 आणि M4 कार्बाइन्ससह पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी पीडितांची धार्मिक ओळख विचारून निवडक हत्या केल्याची माहिती आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तैयबा (LeT) शी संलग्न दहशतवादी संघटनेने घेतली होती, मात्र नंतर त्यांनी जबाबदारी नाकारली. गुप्तचर
यंत्रणांच्या माहितीनुसार, या हल्ल्याचा मास्टरमाइंड LeT कमांडर सैफुल्ला कसुरी (उर्फ खालिद) होता. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाने कँडल मार्चचे आयोजन केले, ज्यात राहुल गांधी सहभागी झाले. ते श्रीनगरमध्ये जखमींची भेट घेण्यासाठीही गेले होते. काश्मीरमध्ये स्थानिक मुस्लिम समुदायानेही हल्ल्याचा निषेध केला असून, अनेकांनी विशेष प्रार्थना आणि एकजुटीचे आवाहन केले आहे.
Web Title: Status in support of halgam attack bajrang dal aggressive tension in solapur