बांगलादेशनंतर आता पाकिस्तानातही हिंदूवर अत्याचार! २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या (Photo Credit- X)
ही घटना बादिन जिल्ह्यातील तलहार गावात ४ जानेवारी रोजी घडली. कैलाश कोहली हा जमीनदार सरफराज निजामानी याच्या शेतात कामाला होता. आपली राहण्याची सोय व्हावी यासाठी कैलाशने शेतात एक तात्पुरता निवारा तयार करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आपल्या जमिनीवर हिंदू शेतकऱ्याने निवारा बांधलेला निजामानीला आवडले नाही. याच क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या निजामानीने कैलाशवर थेट गोळ्या झाडल्या. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या कैलाशला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
कैलाशच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ पून कुमार कोहली यांनी पोलिसांत तक्रार (FIR) दाखल केली. मात्र, सुरुवातीला पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत हिंदू समुदायाने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. शेकडो नागरिकांनी बादिनमध्ये धरणे आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी केली.
वाढता जनक्षोभ पाहून सिंध पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. एसएसपी (बादिन) कमर रजा जस्कानी यांनी माहिती दिली की, विशेष पथकाने हैदराबादमधील फतेह चौक परिसरातून मुख्य आरोपी सरफराज निजामानी आणि त्याचा साथीदार जफरुल्लाह खान याला शनिवारी रात्री अटक केली.
सिंधमध्ये हिंदू अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या ‘हिंदू वेल्फेअर ट्रस्ट’चे शिव काची यांनी सांगितले की, “हे आंदोलन केवळ न्यायासाठी होते. आयजी (IG) जावेद अख्तर ओधो यांनी स्वतः पीडित कैलाशच्या वडिलांना फोन करून आरोपींच्या अटकेचे आश्वासन दिले, तेव्हाच हे आंदोलन मागे घेण्यात आले.” या प्रकरणात निष्पक्ष सुनावणी व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून पाकिस्तानातील हिंदू सुरक्षित राहू शकतील, अशी भावना समुदायाकडून व्यक्त केली जात आहे.






