Photo Credit : Social Media
जळगाव: जळगावमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास दगडफेक करण्यात आली. शुक्रवारी (12 जुलै) सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ ही दगडफेक झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण प्रवाशांमध्ये एक भितीचे सावट निर्माण झाले होते.
या दगडफेकीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार, ट्रेन अमळनेरजवळ पोहचताच काही अज्ञातांनी ट्रेनची साखळी खेचली. त्याच ठिकाणी काही शेकडो नागरिकही जमल्याचे दिसून येत आहे. गाडी थांबताच त्यांनी ट्रेनवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. ट्रेनमधील शेकडो प्रवासी भितीने ओरडताना दिसत आहेत. तब्बल अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. त्यानंतर ट्रेन संथ गतीने सुरू झाली. पण ट्रेनवर दगडफेक करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
खरेतर दररोज हजारो प्रवासी भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून ही या ट्रेनला खूपच उशीर होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात वारंवार ट्रेन थांबत असल्यानेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या संतापातूनच ही दगडफेक झाली असावी, असा अंदा व्यक्त करण्यात आला आहे. पण ही दगडफेक याच कारणाने करण्यात आली की अन्य कोणत्या कारणासाठी करण्यात आली, ते अद्याप समोर आलेले नाही