पिंपरी-चिंचवडमधील सर्व पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; महापालिकेची मोठी मोहीम
पिंपरी : शहरातील मुख्य रस्ते आणि नद्यांवरील पुलांचे आयुष्यमान तसेच सुरक्षिततेची स्थिती तपासण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. वाढत्या वाहतुकीचा ताण आणि पुलांच्या टिकाऊपणाबाबत निर्माण झालेल्या शंका लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांवर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर उड्डाण पूल, साखळी पूल आणि मोठ्या पुलांची उभारणी करण्यात आली आहे. दररोज हजारो वाहने या पुलांवरून धावत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा सखोल आढावा घेणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थापत्य विभागाने २१ जुलै रोजी निविदा प्रक्रिया राबवून स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सल्लागार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले होते. या निविदेत सहा सल्लागार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर २९ जुलै रोजी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या उपस्थितीत सल्लागारांचे सादरीकरण झाले.
तांत्रिक तपासणीनंतर पात्र ठरलेल्या तीन सल्लागार कंपन्यांमधून एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामाला आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीमार्फत मंजुरी दिली असून, लवकरच पुलांच्या प्रत्यक्ष तपासणीस सुरुवात होणार आहे.
या ऑडिट अहवालातून कोणते पूल दुरुस्तीयोग्य आहेत, कोणते बदलावे लागतील आणि भविष्यातील देखभालीसाठी कोणती उपाययोजना आवश्यक आहे, याबाबत सविस्तर निष्कर्ष समोर येणार आहेत. या अहवालावरून महापालिका शहरातील पुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुढील योजना आखणार आहे.






