म्हसवड : सोमवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जात आहे त्यानिमीत्त संपूर्ण देशभरात आनंद सोहळा साजरा होत आहे, माण तालुक्यात ही या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असुन म्हसवड शहरात यानिमीत्त विविध ठिकाणी अक्षदांच्या पोटली बांधण्यात महिलावर्ग दंग झाल्याचे दृष्य आहे, तर अनेक ठिकाणी शहरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी होत असलेल्या या आनंदी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी म्हसवडकर जनता व भाविक खुपच आनंदीत झाली असुन आपल्या रामलल्लाच्या या धार्मिक सोहळ्यानिमीत्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्रीराम मंदिराची स्वच्छता व सुशोभिकरण रामभक्तांकडुन करण्यात आले आहे तर मंदिरासमोर भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दिवे तयार करण्यासही वेग आला असुन महिलावर्गाचा उत्साह मोठा आहे. शहरातील बहुसंख्य महिला ह्या अक्षदांच्या पोटली बांधण्यात व्यस्त आहेत, तर अनेक ठिकाणी महाप्रसाद तयार करण्याची लगबग सुरु आहे. म्हसवड शहरात ठिकठिकाणी रामलल्लाचे झेंडे लावण्यात आले असल्याने शहरात सध्या भगवे वादळ निर्माण झाल्याची प्रचिती येत आहे.