सुजय विखे पाटील (फोटो- ट्विटर)
भाजप आमदार नितेश राणे हे सध्या राज्यभरात महंत रामगिरी महाराज आणि बांगलादेशमधील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मोर्चे काढत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये देखील मोर्चा काढला होता. त्यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी चालायला लागलो तर लोक दार बंद करतात. मी हिंदूंचा गब्बर आहे. याप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर आता अहमदनगर भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.
अहमदनगरमध्ये नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोर्चाचे आयोजन करणाऱ्यांवर देखील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणात आता सुजय विखे पाटलांनी उडी मारली आहे. त्यांनी याप्रकरणात नितेश राणेंना घरचा आहेर दिला आहे. सुजय विखे पाटील यांनी नितेश राणेंना खडे बोल सुनावले आहेत.
हेही वाचा: चितावणीखोर वक्तव्यांप्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटील हे आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटलांनी नितेश राणेंना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, ”शिर्डीमध्ये कोणीही असुरक्षित नाहीत. या मतदारसंघात हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम टिकले पाहिजे. अनेक वर्षे आपण एकोप्याने राहतो आहोत. जाती-धर्म पाहून आम्ही काम करत नाही. तीस वर्षांमध्ये आम्ही कधीही जात विचारली नाही. हल्ली जातीचे विष पसरवणारे जनतेला नको आहेत. आता जनतेच्या गरजा महत्वाच्या आहेत. या मतदारसंघात जाती-धर्मावरून तेढ निर्माण करत असाल किंवा द्वेष निर्माण करत असाल तर गाठ माझ्याशी आहे,” असा इशाराच सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.
भडकाऊ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी मुस्लिमांना उघड धमकी दिली होती. मुस्लिमांना निवडून- निवडून मारणार असल्याची धमकी नितेश राणे यांनी दिली होती. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर चिथावणीखोर भाषणे आणि हत्येच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ठिकाणी नितेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा श्रीरामपूर आणि दुसरा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. नितेश राणेंनी मुस्लिमांना खुलेआम धमक्या दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर नितीश राणेंनी सभेत मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली. ते म्हणाले, ‘आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू,’ अशी खुली धमकीच त्यांनी दिली होती. असे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या पैगंबरावर केलेल्या टिप्पणीनंतर हा मोर्चा काढण्यात आला.