पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातून गेल्या काही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप प्रणित उमेदवाराला मत्ताधिक्य मिळाले आहे. २०१९ च्या निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना ६५ हजार ४९४ तर दौंड मधून ७ हजार मतांचे मत्ताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हे मताधिक्य कमी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘खडकवासला’वर विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मताधिक्य २१ हजारांपर्यंत खाली आणण्यात सुळे यांना यश आले आहे.
खडकवासलातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना १ लाख ४१ हजार ९२८ मते मिळली. तर सुळे यांना १ लाख २१ हजार १८२ मते मिळाली. दौंडमधील गेल्या निवडणुकीतील कांचन कुल यांना ७ हजारांची मताधिक्य होते. परंतु सुळे यांना २६ हजार ३३७ मतांचे मत्ताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत खडकवासला विधानसभा मतदार संघात विशेष लक्ष दिले होते. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
सुनेत्रा पवार यांना खडकवासला आणि बारामती, इंदापूर आणि दौंड विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती. कारण दौंडमध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी सुनेत्रा यांच्यासाठी काम केले. बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आमदार आहेत. तर इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी तर खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार भिमराव तापकीर यांनी महायुतीचा धर्म पाळत सुनेत्रा पवार यांचे काम केले. तसेच जिल्हा बँक, दुध संस्था अजित पवारांच्या समर्थकांच्या ताब्यात असल्याने मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, खडकवासला वगळत इतर सर्व विधानसभा मतदार संघातून खासदार सुळे यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे.
बारामती विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांना होती. मात्र, सुळे यांना १ लाख ४३ हजार ९४१ तर सुनेत्रा पवार यांना ९६ हजार ५६० मते मिळाली. सुळे यांना ४७ हजार ३८१ एवढे मताधिक्य मिळाले. खडकवासलामध्ये सुनेत्रा पवार यांना १ लाख ४१ हजार ९२८ मते मिळाली. तर सुळे यांना १ लाख २१ हजार १८२ मतांवर समाधान मानावे लागले. सुनेत्रा पवार यांना येथून किमान ५० ते ६० हजार मतांची आघाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना २० हजार ७४६ मतांची आघाडी मिळाली.
इंदापूरमध्ये आजी-माजी आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करत होते. सुनेत्रा पवार यांना ८८ हजार ६९ तर सुळे यांना १ लाख १४ हजार २० मते मिळाली. दौंडमधूनही सुळे यांना २६ हजार ३३७ मतांची आघाडी मिळाली. गेल्या काही निवडणुकांमध्ये पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मत्ताधिक्य गेल्याचे दिसून आले. परंतु यंदा सुळे यांना ३५ हजार २८१ मतांची आघाडी मिळाली. भोर विधानसभा मतदार संघातून सातत्याने सुळे यांना मत्ताधिक्य मिळत आले आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी मनापासून सुळे यांचा प्रचार केला होता. भोर विधानसभा मतदार संघातून सुळेंना ४३ हजार ८०५ मतांची आघाडी मिळाली.
आकडेवारी काय सांगते ?
विधानसभा मतदार संघ – सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार
खडकवाला १२११८२ १४१९२८
इंदापूर – ११४०२० ८८०६९
दौंड ९२०६४ ६५७२७
पुरंदर १२५९४८ ९०६६७
बारामती १४३९४१ ९६५६०
भोर १३४२४५ ९०४४०