मुंबई : सुन्नी पंथाच्या मुस्लिम समाजासाठी अतिरिक्त दफनभूमी देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेची सुटीकालीन न्यायालयाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने १४ नोव्हेंबरला सुनावणी निश्चित केली आहे.
गोवंडी येथील स्थानिक रहिवाशांसह अॅड. शमशेर अहमद शेख यांनी दफनभूमी अभावी सुन्नी पंथाच्या मुस्लिम समाजात नागरिकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. गोवंडी परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या दफनभूमींचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे. आता दफनभूमींतील अपुऱ्या जागेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त दफनभूमीची नितांत गरज असल्याकडे अॅड. शमशेर शेख यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
तसेच उच्च न्यायालयाने यापूर्वी दफनभूमी संदर्भात पालिका आयुक्तांना निर्देश दिले असतानाही पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदा जानेवारी देवनार येथील दफनभूमी बंद करण्याचे आदेश जारी केले. तो आदेश रद्द करण्यात यावा. तसेच प्रस्तावित रफीनगर दफनभूमीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी, अशीही मागणी करत मुंबई महापालिकेला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती केली. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी १४ नोव्हेबर निश्चित केली.