सोलापूर : ऑगस्ट २०२२ अखेर आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद सोलापूर येथे रुजू झालेल्या शिक्षकांना त्वरित पदस्थापना देण्यात यावी व पदस्थापना देण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य कास्ट्राईब शिक्षक महासघांचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली.
कांबळे यांनी शुक्रवारी सोलापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आंतरजिल्हा बदलीवरून रूजू होत असणाऱ्या शिक्षकांचे प्रलंबित पगार, महागाई फरक त्वरीत अदा करण्यात यावे. तसेच करमाळा पंचायत समितीतील उपशिक्षक स्वर्गवासी हरी काळे यांच्या कुटुंबीयांना सर्व आर्थिक लाभ देण्यात व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्यात यावी. माढा तालुक्यातील मानेगाव येथील संजीवनी विद्यालयातील लिपिक कौस्तुभ काळे यांना नियुक्ती दिनांक २२/१०/२०१२ पासून अनुसूचित जमाती (एस.टी) कनिष्ठ लिपिक म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी कांबळे यांनी केली.
तसेच आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्त देणे व त्यांचा पगार करणे याबाबत सीईओ दिलीप स्वामी व शिक्षणाधिकारी लोहार यांनी जाणीवपूर्वक विलंब केला आहे. शिक्षकांच्या अवेळी बदल्या करून पात्र शिक्षकांवर अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व शिक्षकांचा पगार या दोघांच्या पगारीतून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही कांबळे यांनी यावेळी केली.
संपतीची चौकशी करा…
सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदमधील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाला सादर केलेल्या माता व दायित्व याची प्रत्यक्ष गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी व उत्पन्नापेक्षा अधिकचे स्त्रोत आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशा अधिकाऱ्यांना पुनर्स्थापना देताना महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात देण्यात यावी. यामुळे महाराष्ट्र राज्यात शिक्षकांचा आर्थिक छळ होणार नाही व एक आदर्श प्रशासन निर्माण होईल.
याही मांडल्या मागण्या…
समाजशास्त्र विषय नकार मंजूर करून त्यांचे तात्काळ समायोजन करावे. दर महिन्याचे वेतन राज्य शासनाच्या सूचनेनुसार एक तारखेला करण्यात यावे. केंद्रप्रमुख पदोत्रती तात्काळ करावी. प्रलंबित मेडिकल बिले तातडीने मंजूर करण्यात यावी. प्रलंबित वरीष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी त्वरित देण्यात यावी. प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांनी सदर बदली प्रक्रियेत सहकार्य. विलंब होणार नाही याची काळजी सर्व जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेनंतर त्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या शाळांवर होण्याची सक्ती करावी. विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा मागण्या यावेळी कांबळे यांनी मांडल्या आहेत.