सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिरोळ : ऊस दराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमाभागात ऊस वाहतूक रोखण्यासाठी संघटनेने तंबू ठोकले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार जिल्हा स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सीमाभागातील शेडशाळ, आलास, पाचमैल परिसरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कडेला तंबू उभारले असून, खुर्च्या लावून ऊस वाहतूक रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कर्नाटकातील कारखान्यांकडे ऊस वाहतूक होऊ नये, यासाठी दिवस-रात्र लक्ष ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वतःहून स्वीकारली आहे.
या वर्षीच्या गळीत हंगामासाठी कारखानदारांनी प्रति टन ३४०० ते ३४५० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा दर फसवा ठरवत उसाला योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ, पाणी व खतांच्या दरात वाढ आणि साखरेच्या बाजारभावातील फरक लक्षात घेता सध्याचा दर अन्यायकारक असल्याचे मत संघटनेने मांडले आहे.
गनिमीकाव्याचा अवलंब करणार
जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना त्यांच्या घामाच्या किमतीचा न्याय दर मिळालाच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक पूर्णपणे रोखली जाईल. सध्या सीमाभागात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी तंबूंमध्ये ठाण मांडले असून, शेतकरी, युवक आणि वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. गनिमी काव्याच्या पद्धतीने आंदोलनाचा टप्पा तीव्र करण्याची तयारी संघटनेकडून सुरू आहे.
पोलिस प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष
दरम्यान, ऊस वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेच्या वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. ऊसदराच्या मुद्द्यावरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले असून, आंदोलनाची ठिणगी कधीही प्रखर रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






