ठाकरे गटाला धक्का; मोहल्यातील नागरिकांचा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
महाड : महाड विधानसभेत प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भरत शेठ गोगावले व ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. आमदार भरत शेठ गोगावले हे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले असून चौथ्यांदा विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुस्लिम मतांचा फटका महायुतीला बसला होता.
यामुळे राज्यात महायुतीसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र बदलताना दिसत आहे. स्थानिक उमेदवारांची तिथल्या मुस्लिम बांधवांशी असणारी नाळ ही अनेक वर्षांपासून जोडली गेलेली आहे. धर्मनिरपेक्ष आमदार अशी ओळख असणाऱ्या आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चांढवे मोहल्ला येथील नागरिकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
मागील महिन्यामध्ये चांगले ग्रामपंचायतचे माजी सरपंच इरफान अंतुले यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर साळवे गावातील राजकीय समीकरण बदलतील असे चित्र निर्माण झालं होतं, परंतु या पक्षप्रवेशाने चांढवे गाव हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्यास हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
हे सुद्धा वाचा: ‘सर्वमान्य उमेदवार असलेल्या काडादी यांना विजयी करा’; माजी आमदार माने यांचं आवाहन
प्रवेशकर्ते रफिक पानसारी यांनी यावेळी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार आमदार भरत शेठ गोगावले हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले नंतर जनमानसात फिरणारे आमदार आहेत. आमदार गोगावले हे कोणती जात बघत नाहीत, कोणता धर्म बघत नाहीत तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला समसमान वागणूक देतात. मी एमजीएम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना पक्षात नसूनही आमदार गोगावले यांनी माझ्या कुटुंबीयांकडे माझ्या तब्येतीची विचारपूस केली. यापुढे एमजीएम रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा करून माझे विशेष काळजी घ्यायला सांगितली व हॉस्पिटलचे झालेल्या सर्व बिल आमदार गोगावले यांनी अदा केले. याउलट मी ज्या पक्षामध्ये मागील काही वर्षे होतो, त्या पक्षातील नेतेमंडळी कार्यकर्त्याने घरी बोलावतात व तासंतास वाट बघायला लावतात अशा कटू आठवणी देखील यावेळी व्यक्त केल्या.
आमदार भरत शेठ गोगावले यांनी उपस्थितांना संबोधित करताना ‘ज्यांनी निवडणुकीच्या काळात पक्षातून पळ काढला, त्यांना पुन्हा आमच्याकडे थारा नाही असे खडे बोल इरफान अंतुले यांना सुनावले. तुम्ही निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षात आलात, त्यामुळे तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही असे सुतोवाच देखील यावेळी बोलताना व्यक्त केले.
चांढवे मोहल्यातील रफिक पानसरी, वहाब पानसारी, लक्ष्मण जाधव, खलील अंतुले, निजाम अंतुले, अदान अंतुले, शादाब अंतुले, शाबीर अंतुळे, तरबेज अंतूले, फारूक अंतुले, असलम अंतुले, हलीद अंतुले, अफान पानसरी, यासद अंतुले , रुपेश शेलार इत्यादींनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कालीजकर, शिवसेना वरंध विभाग संघटक लक्ष्मण भोसले, उपतालुकाप्रमुख संदीप झांजे, विभाग प्रमुख धाडवे, वरंध विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत,
गणपत शेडगे, अविनाश शेलार,कोतेरी गावचे माजी सरपंच बाळू तांबडे,किशोर घावरे, अजिम गीते आदी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा: ना सभा,ना रोड शो तरीही ‘गाव विकास समिती’च्या प्रचाराचा अनेकांनी घेतला धसका !