कल्याण: कल्याण पूर्व भागातील कचोरे परिसरात एका टेकडीवरील सहा घरांची भिंत कोसळली. स्थानिक नागरीकांना घटनेची माहिती मिळताच स्वत: घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या रहिवासियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे माती खचल्याने ही घटना घडली आहे.
इर्शाळवाडी, माळीण आणि अशा कितीतरी घटना घडल्या असून देखील स्थानिक प्रशासन या अशा दुर्घटनांकडे कसं काय दुर्लक्ष करतात हा प्रश्न कायम आहे. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात देखील इर्शाळवाडी आणि माळीणसारखी दुर्घटना होता होता राहिली आहे. कचोरे परिसरातील टेकडीवर लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे माती खचल्याने येथील एका घराची भिंत कोसळली. कचोरे गावातील नागरीकांनी या घरांच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना घराबाहेर काढण्यास मदत केली. प्रसंगावधान राखत नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. सुदैवाने ज्या घराची भिंत कोसळली ते घर आणि इतर पाच अशी सहा घरं रिकामी होती. ज्या घरांची भिंत कोसळली त्या घरांना जमीनदोस्त करण्याचे काम सुरु केले. ही घटना कळताच टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांच्यासह महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी धाव घेतली.
घटनेची पाहणी करुन त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. महापलिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले, पावसाळ्यात आम्ही टेकडीवर राहमाऱ्या नागरीकाना सूचना देतो. ज्या भिंत कोसळली. त्याठीकाणी कोणी राहत नव्हते. स्थानिक नागरीकांनी पुढाकार घेऊन कोसळलेल्या घरांना जमीनदोस्त करण्याचे काम सुरु आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस पडत आहे. या पावसामुळे माती खचली त्यामुळे घराची भिंत कोसळून ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवित हानी झालेली नाही.
याआधी देखील तीन वर्षांपूर्वी याच भागात दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी 104 कुटुंबियांना तात्काळ घरं खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. तशी नोटीस जारी करण्यात आली होती. यावेळी देखील पुन्हा तशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.