अंबरनाथमध्ये मतदार यादीचा 'सावळा गोंधळ'! (Photo Credit - X)
अंबरनाथ (शहर प्रतिनिधी): नगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच, अंबरनाथमधील अंतिम मतदार यादीतील ‘सावळ्या गोंधळा’मुळे शहरातील इच्छुक नगरसेवक आणि सामान्य मतदारांमध्ये संभ्रम व संताप निर्माण झाला आहे. एकाच वॉर्डात शहरातील इतर वीस ते पंचवीस वॉर्डांतील ५० ते १०० मतदारांची नावे टाकण्यात आल्याचे धक्कादायक पुरावेच महाविकास आघाडी आणि मनसेने समोर आणले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीतून हा प्रकार समोर आला आहे. यादीतील हा ‘खेळ’ पाहून लोकशाही आणि मतदारांचा अपमान होत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
एका वॉर्डातील नावे लगतच्या वॉर्डात काही प्रमाणात इकडची तिकडे होऊ शकतात. मात्र, अतिशय जास्त अंतरावर आणि वॉर्डाच्या सीमेपासून पूर्णपणे वेगळ्या भागात असलेल्या वॉर्डातील नावे दुसऱ्याच वॉर्डात टाकण्यात आल्याने नक्की हा प्रकार तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.
मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, “काही उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रत्येक वॉर्डातील काही मतदार शहरातील इतर वॉर्डात ‘फिरवले’. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील ४०-५० मतदार दुसऱ्या वॉर्डात टाकण्याचे काम केले आहे. ज्या वॉर्डात इच्छुक उमेदवार आहे, त्याचे नाव दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आले आहे.”
Thane News : – ठाण्यातील दिवा मतदार यादी घोटाळ्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ?
या गोंधळात स्थानिक माजी नगरसेवकांची नावे देखील इतर वॉर्डात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेना आणि भाजपच्या काही माजी नगरसेवकांचे नावे दुसऱ्या वॉर्डात टाकल्याने त्यांच्यासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्वात मोठा खुलासा करताना सांगितले की, “उल्हासनगरातील काही माजी नगरसेवक आणि माजी महापौरांची नावे देखील अंबरनाथच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.” प्रदीप पाटील यांनी या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. मुख्याधिकाऱ्यांनीही हे मान्य करून लेखी अर्ज देण्यास सांगितले आहे.
महाविकास आघाडी (शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत पुरावे समोर आणले. मतदार यादीतील हा सावळा गोंधळ आधी दूर करावा आणि मगच पारदर्शकपणे निवडणुका घेण्यात याव्यात. घाईघाईने निवडणूक घेऊन मतदार आणि लोकशाहीचा अपमान करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.






