महानगरपालिकेचे बिगुल, मात्र नेत्यांचे वेगळेच गणित (फोटो सौजन्य - iStock)
माजी आमदार संदीप नाईक यांचा भाजपा प्रवेश झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ऐरोलीचे दोन वेळा आमदारपद भूषवलेल्या संदिप नाईक यांचा बेलापुर विधानसभा क्षेत्रात देखील आकडेवारीचा दांडगा अभ्यास असल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसून आले आले आहे. अवघ्या ३७५ मतांनी त्यांना पराभवाची चव चाखावी लागली असली तरी त्यांनी सर्वच पक्षांना आपली दखल घेण्यास भाग पाडले होते.
Navi Mumbai: काँग्रेसमध्ये असताना पक्ष श्रेष्टींचा पाठिंबा मिळत नव्हता, पूनम पाटील यांची खंत
काय आहे रणनीती
भौगोलिक स्थितीसोबत, विविध समाजानुसार त्यांनी आखलेली रणनीती बेलापूर मतदार संघात अनेक विभागात यशस्वी झाल्याचे दिसून आले होते. त्यात माविआने अनेक ठिकाणी त्यांना योग्य साथ दिल्याचे माविआच्या नगरसेवकांच्या विभागातील मताधिक्यावरून दिसून आले होते. असे असताना मात्र संदिप नाईक यांची भिस्त असलेल्या नाईक समर्थक अनेक नगरसेवकांनी मात्र कच खाल्ल्याचे दिसून आले होते.
निवडणुकीत सपशेल ढेर
स्वतःच्या निवडणुकीत शेर ठरणारे अनेक नेते मतांचा अभ्यास केल्यास सपशेल ढेर झाल्याचे दिसून आले होते. गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने संस्थानिक बनलेल्या या त्यांच्या विभागात संस्थानिक बनलेल्या नेत्यांबाबत नवी मुंबईत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. सर्व काही आम्हालाच हा होरा अशा पद्धतीने हे नेते वागत गेले, तर गणेश नाईक देखील या नेत्यांची मर्जी सांभाळत तथास्तु म्हणत गेले.
मात्र जेव्हा आपल्याला मोठे करणाऱ्या नेत्यांची लढायची वेळ आली त्यावेळी मात्र या संस्थानिक कमी पडल्याचे २०१५ व २०२४ च्या निवडणुकीत पहायला मिळाले. या दोन्ही निवडणुकीत गणेश नाईक व संदीप नाईक काहीशे मतांनी पडले होते. हा पराभव नाईक कुटुंबीयांसाठी धक्कादायक होताच, मात्र नाईकांशी निष्ठा राखणाऱ्यांच्या मनात ती सल कायम कोरली गेली.
काय आहे अभ्यास
मिळालेल्या मतांची बेरीज वजाबाकी पाहता, यात वरच्या फळीतील अनेक नेत्यांची न केलेली “मेहनत” दिसून आली होती. तर नाईक नावाला पक्ष समजणाऱ्या त्यांच्या दुय्यम फळीतील कार्यकर्त्यांकडून देखील या वरच्या फळीतील नेत्यांनी दगा दिल्याची कबुली दिली होती. अशा नेत्यांना नाईकांनी निवडणुकीवेळी खरोखर विचार करावा अशी भूमिका नाईक समर्थक २०१५ साली व २०२४ नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर मांडताना दिसत होते. त्यांच्या बोलण्यातून नेत्यांप्रती असलेली निष्ठा दिसून येत होती. त्यामुळे यंदा संदिप नाईक यांच्यासारखा कसलेला राजकारणी या संस्थानिकांना असमान दाखवतो का ते पाहावे लागणार आहे.






