सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?
भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात काही तासांच्या पावसातच शहरातील अनेक रस्ते आणि सुमारे ७५ सखल भाग जलमय झाले. मिरा रोडमधील यापूर्वी पाणी न साचणाऱ्या परिसरांमध्येही यंदा पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.
MIRA BHAYNDAR : मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा कहर; आपत्ती व्यवस्थापन विभागावर प्रश्नचिन्ह
प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप नगरसेवक विजय पाटील, सचिन डोंगरे आणि करुणा पाटील यांनी नालेसफाईतील हलगर्जीपणाचा आरोप करत साचलेल्या पाण्यातच आंदोलन केले. संबंधित अधिकारी आणि नालेसफाईच्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
या आंदोलनामुळे मात्र एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेत सत्ता भाजपची, लोकप्रतिनिधी भाजपचे आणि आंदोलनही भाजपच्या नगरसेवकांचेच. मग प्रशासनावर नियंत्रण नेमके कोणाचे? जर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर शहरातील कारभार कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ झाल्याचे दावे केले जातात. मात्र पहिल्याच जोरदार पावसात शहर जलमय होत असल्याने या खर्चाचे नेमके काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नालेसफाईची कामे कागदोपत्री झाली की प्रत्यक्षात, याची चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे.
याशिवाय शहरातील सखल भागांमध्ये बसविण्यात आलेले लाखो रुपयांचे पाणी उपसणारे पंपही अनेक ठिकाणी बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पाणी तासन्तास साचून राहिले. आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दिसून न आल्याने नागरिकांनी समाजमाध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदाही परिस्थितीत कोणताही बदल दिसून न आल्याने महापालिकेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन दोषींवर कारवाई करून जबाबदारी निश्चित करणार की पुन्हा एकदा चौकशीच्या घोषणांपुरतेच प्रकरण मर्यादित राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






