नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मूर्धा गावावर शोककळा
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाटील हे शुक्रवारी दुचाकीवरून मेन रोडने प्रवास करत होते. यावेळी सदानंद नगर, राई ऑफिस परिसरात अचानक एक नारळाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. या अनपेक्षित आणि भीषण दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. या घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत राहुल पाटील यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू ठेवले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राहुल पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच मूर्धा गावासह परिसरात शोककळा पसरली. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. पाटील कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक आणि जीर्ण अवस्थेतील झाडांची वेळेवर तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे केवळ एका दिवसात (२ जुलै रोजी) झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या एकूण ९१ तक्रारी महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या。 यातील १३ तक्रारी शहरात, २२ पूर्व उपनगरात आणि सर्वाधिक ५६ तक्रारी पश्चिम उपनगरात नोंदवल्या गेल्या。 याआधी जुलैच्या सुरुवातीला सलग २४ तासांत ९९ पेक्षा जास्त झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या होत्या.






