काँग्रेसची नवी रणनिती, कल्याणमध्ये गरजूंसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा
कल्याण: विधानसभा निवडणूकीला काही दिवस राहिले आहेत. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये या जागांसाठी रस्तीखेच सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कल्याण पश्चिम आणि पूर्व ही जागा मिळण्यासाठी रणनिती आखली जात आहे. कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी स्वखर्चातून 10 हजार गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर रिफिल करुन देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. विधानसभेच्या निवडणूकीसाठी राजाभाऊ काँग्रेसकडून इच्छूक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीकरीता जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी गॅस सिलेंडरचे मोफत रिफिल देण्यात येत आहेत का अशा चर्चा रंगत आहे.
हेही वाचा- महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘बडी कॉप’ योजना राबवावी; युवक काँग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सर्व पक्षीय उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मात्र कोणती जागा कोणत्या पक्षाने लढवावी या बाबात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत हे सर्वात मोठं आव्हान आहे. कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा आहेत. या चारही विधानसभांपैकी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभेवर काँग्रेस दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी कल्याण पश्चिम भागात नव्या सोयी व उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दहा हजार गरजू महिलांना स्वखर्चातून मोफत गॅस सिलेंडर रिफिल करुन देणार असल्याची घोषणा केली आहे.कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जागांवर काँग्रेसने दावा ठोकला असून या दोन्ही जागा काँग्रेसला नाही मिळाल्या तर इच्छूक उमेदवार बंडखाेरी करणार का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून सचिन बासरे, काँग्रेस पक्षाकडून कांचन कुलकर्णी आणि पातकर हे इच्छूक असल्याची चर्चा आहे. पूर्वेत काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे आणि शरद पाटील हे इच्छूक असल्याची चर्चा आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पाटकर काँग्रेस पदाधिकारी विमल ठक्कर काँग्रेस पदाधिकारी राजेश तिवारी उपस्थित होते.