फोटो सौजन्य: गुगल
ठाणे/ स्नेहा काकडे : महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्तापरिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन – 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा’ अंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवुन आणली आहे.
यामध्ये विशेष प्रयत्नशिल राहणारे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद, ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने ९२.०० गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावले.
या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाणेच्या प्रत्येक अधिकाकारी आणि कर्मचाऱ्याचं आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी याचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या १०० दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील, असंं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितलं आहे.
या उल्लेखनीय यशामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रशासनाच्या कार्यक्षमतेस मान्यता लाभली आहे. ही उपलब्धी जिल्हा परिषद ठाणेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे व निष्ठेचे फलित आहे.शासनाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी समर्पित असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे अभिनंदन करण्यात येत आहे. हा सन्मान भविष्यातील जिल्हा परिषदेच्या कामकाजात अधिक गुणवत्ता व पारदर्शकता साधण्यासाठी प्रेरणादायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेचे १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत नाविन्यपुर्ण कामकाज
‘Door Step Delivery’ सर्व शासकीय कागदपत्र नागरिकांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी ‘Door Step Delivery’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सदर उपक्रम ४३१ ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित करण्यात आला असून २० दिवसात ३ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घर बसल्या शासकीय कागदपत्र घेण्याचा लाभ देण्यात आला आहे.
दिशा उपक्रम
ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात जास्त असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी दिशा उपक्रमातून 31 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्या एआयच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. 10 महिन्याच्या कालखंडात भाषा आणि गणित या विषयात अध्ययन स्तर दुप्पटीपेक्षा जास्त वाढविण्यात यश आले आहे. सदर उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासन स्तरावर घेत निपूण महाराष्ट्र या उपक्रमात अंतर्भाव करण्यात आला आहे.
ई ऑफिस
जिल्हा परिषद अंतर्गत ई ऑफिस मार्फत सर्व फाईल व टपाल डिजिटल फाईल मोमेंट करण्यात येत असून चार स्तरांपेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे तसेच प्रत्येक नस्ती सात दिवसांमध्ये निपटारा करण्याचे प्रयत्न असून कागद विरहित कामकाज करण्यात जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे.
स्कीम एप्लीकेशन पोर्टल
जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांची माहिती, उद्देश, अर्ज भरण्याच्या पद्धती याची सविस्तर माहिती या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच यावेळी पोर्टलचा वापर करून लाभार्थी डिजिटल पद्धतीने अर्ज देखील करू शकतात.
Block Facilitation Committee
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा स्तरावरावरील अधिकारी पंचायत समिती स्तरावर जावून तालुका सुविधा समिती योजना “Block Facilitation Committee” अंतर्गत ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.
ई कामवाटप
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन विकास कामाचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. यामार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले आहे.
ई. एच. आर. एम. एस
ई. एच. आर. एम. एस. वेबसाईट मार्फत जिल्हा परिषदेच्या 500 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक डिजिटल पद्धतीने संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले असून सेवाविषयक सर्व बाबी व लाभ वेळेत देण्यासाठी या वेबसाईटचा वापर करण्यात येणार आहे.
कामकाजात AI चा वापर
चॅट जी पी टी मार्फत शासकीय कामकाजाच्या टिपणी, पत्र, नोंद, संशोधन याबाबत मार्गदर्शन घेऊन काम जलद गतीने करण्यात येत आहे. तसेच नोटबुक एल. एम. याचे वापर करून शासकीय पुस्तक, जीआर किंवा माहिती असलेले कागदपत्र अपलोड केल्यास त्याबाबतचे संक्षिप्त किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जलद गतीने करण्यात येत आहे. कॅनव्हाचा वापर करून शासकीय कामकाजाचे पावरपॉइंट प्रेझेंटेशन, मायका ॲप चे वापर करून मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी चॅटबोट चा वापर करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच आपली मानसिक स्थिती याबद्दलची माहिती मिळते तसेच उपचार घेण्यासाठी देखील त्याचा फायदा होतो. गामा अँप चे वापर करून काही मिनिटांत शासकीय कामकाजाचे सादरीकरण करता येते.
AI चा वापर करून शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी उपयोग होत आहे तर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना तुलनात्मक तक्ता कामकाजाचा excel, पावरपॉइंट उपयुक्त असून सर्व ॲपचा वापर करून शासकीय कामकाजात कशाप्रकारे गतिमानता येऊ शकते याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सुशोभीकरण
स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण, अभ्यागत कक्ष, हिरकणी कक्ष, नागरिकांना जिल्हा परिषदेची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत केऑस निर्मिती, जिल्हा परिषदेच्या विविध योजनेची व विभागनिहाय कामकाजाचे व ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या ठिकाणांना जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे.