ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण आणि स्वच्छतेविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत “प्लास्टिक मुक्त ग्राम” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 22 मे ते 5 जून, 2025 या कालावधीत विविध उपक्रम राबवून ही मोहिम जनजागृतीपूर्वक पार पाडण्यात येणार आहेत.
या अभियानाचा शुभारंभ पर्यावरण शपथ घेऊन करण्यात येणार असून, ग्रामस्थांना अभियानात सक्रिय सहभागासाठी जिल्हा परिषदेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे म्हणाल्या की, “प्लास्टिक मुक्त गावांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्रामपातळीवर सामूहिक कृती गरजेची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभागी होणे आवश्यक आहे. ही मोहीम केवळ एक उपक्रम न राहता, “प्लास्टिक मुक्त ग्राम” करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रमुख प्रमोद काळे यांनी सांगितले की, “या मोहिमेंतर्गत प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विशेषतः ‘मासिक पाळी व्यवस्थापन दिन’, ‘थीम एक पृथ्वी, एक आरोग्य’ या उपक्रमांद्वारे शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे यामधून महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. माध्यमांद्वारे आणि स्थानिक सहभागातून या मोहिमेचा मोठा प्रभाव पडेल, असा विश्वास आहे.”
अभियानाचे ठळक वैशिष्ट्ये:
• 22 मे2025 : पर्यावरण शपथ व जनजागृती रॅली
• 28 मे 2025: मासिक पाळी व्यवस्थापन दिन – शाळांमधून किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन
• 29 मे 2025 : ‘थीम एक पृथ्वी, एक आरोग्य’ दिन – योग दिनानिमित्त आरोग्य विषयक उपक्रम
• ग्रामसभा, रॅली, प्रदर्शन, महिला बचत गट, युवक मंडळे यांच्या सहभागातून विविध सर्जनशील उपक्रम
उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक स्वच्छता समिती यांच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे.
याचबरोबर आज जागतिक जैवविविधता दिनानिमित्ताने जैवविविधता दिनाच्या निमित्ताने स्वच्छतेचं महत्त्व नागरिकांना समजावं यासाठी मनपाने हा उपक्रम राबविण्याची योजना हाती घेतली आहे. आज सकाळी सात वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी समर्थ मठ या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेची सुरूवात जनजागृती करणाऱ्या रॅलीने झाली. या रॅलीत स्थानिक नागरिक, स्वच्छता कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर, वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, ऑरनॅट या संस्थेच्या कलाकारांनी स्वच्छतेविषयी जागृती करणारे पथनाट्य सादर केले होते. या निमित्ताने, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्यांच्या मुलाखतीही घेण्यात येत आहेत. गुरूवारी त्या मालिकेचा आरंभ हिरवं स्वप्नं या संस्थेचे संस्थापक अनिल वाघ आणि प्रभा राव यांची पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मुलाखतीने झाला. ही मुलाखत ठाणे रेडिओवर प्रसारित करण्यात आली.