ठाणे /स्नेहा जाधव, काकडे : पहलगामवर झालेला हल्ला आणि आता भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती पाहता अनधिकृतपणे देशात वास्वव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा योग्य तो बंदोबस्त करावा यासाठी नागरिक आक्रमक झाले आहे. अशातच आता ठाणे शहरातील बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्राचे पुरावे बनवून बांगलादेशी नागरिक ठाण्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असल्याचे पोलीस कारवाई मधून निदर्शनास आले आहे. या नागरिकांना बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर दाखले तयार करण्यासाठी शिफारस पत्र देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करून अशा नागरिकांचाही तपास करावा, ओबीसी प्रतिष्ठानचे समन्वयक प्रफुल वाघोले, मेघनाथ घरत दत्ता घाडगे, विशाल वाघ यांनी आमदार संजय केळकर आणि आमदार ऍड. निरंजन डावखरे यांच्या जनता दरबारात लेखी निवेदन दिले आहे.
ठाणे शहरात घुसखोर बांगलादेशी फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक बांधकामांच्या ठिकाणी सर्रास परप्रांतीय मजुरांचा राबता दिसून येत आहे. ठाणे शहरात त्यांच्या टोळ्या सक्रिय असून दर महिन्याला हजारो लोक शहरात घुसखोरी करीत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वास्तवाचा पुरावा नसताना सुद्धा बिनधास्तपणे शहरात अनेक ठिकाणी मासेविक्री, नारळपाणी विक्री, पंक्चरवाले, फळविक्री, अनेक प्रकारचे ज्यूस विक्री अनधिकृतपणे रस्त्याच्या बाजूला हातगाडी लावून करत आहेत. या घुसखोरांमुळे सामाजिक सुरक्षा सुद्धा धोक्यात येत आहे.
या घुसखोरांना आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड वोटर आयडी रहिवासी दाखला अशी विविध कागदपत्रे तयार करण्यासाठी शिफारस पत्र देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी तसेच या घुसखोरांचा तपास करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावे, तसेच अशा लोकप्रतिनिधींवर देशद्रोहाचे खटले दाखल करावेत, अशी मागणीही ओबीसी प्रतिष्ठानने दिलेल्या पत्रात केली आहे.
भारतात बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत आहे. सहज उपलब्ध होणार्या पॅनकार्ड व आधारकार्ड अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे हे घुसखोर राजरोसपणे वावरत आहेत. कोणत्याही पोलीस व्हेरीफिकेशनशिवाय ही मंडळी बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. या निवेदनाबाबत पोलीस महसूल यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा स्तरावर लवकरच बैठक घेऊन बांगलादेशींना अभय देणाऱ्या लोकप्रतिनिधींना कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन आमदार संजय केळकर तसेच निरंजन डावखरे यांनी दिले आहे.