सोलापूर : कसबा येथील (Kasba Peth Bypoll) विजय हा महाविकास आघाडीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे. भाजप ब्राह्मण समाजाला गृहीत धरते आणि त्यांच्यावर अन्याय करते, याच अन्यायाला कंटाळून ब्राह्मण समाजाने भाजपला चपराक लगावली. म्हणून आता ब्राह्मण समाजाने ठरवलंय की यापुढे महाविकास आघाडीसोबत राहायचं, अशी माहिती काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी (Manoj Kulkarni) यांनी दिली.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. त्यानंतर मनोज कुलकर्णी यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ब्राह्मण समाज हा परंपरागत काँग्रेसचा मतदार आहे. ब्राह्मण समाजाचा भ्रमनिरास या भाजपने केला आहे. याचाच वचपा आजच्या कसबा निवडणुकीतून निघालेला आहे. ब्राह्मण समाजातील आश्वासन, भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ, अमृत महामंडळ ही दिलेली फक्त गाजरं आहेत. भारतीय जनता पक्षाने दिलेले हे गाजर याचाच भाग म्हणजे मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं. टिळक घराणं संपवण्याचं काम भाजपनं केलं, याचा राग कसबा निवडणुकीत दिसून आला.
दरम्यान, पुण्यातील मतदार, ब्राह्मण समाज यांनी अत्यंत चांगला निकाल दिला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘चिंचवडची सीट लागायला पाहिजे होती. परंतु, दुर्दैव गड आला पण सिंह गेला असेच म्हणावे लागेल’.
हेमंत रासनेंना 61,771 मतं
संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली. यामध्ये कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजय झाला तर हेमंत रासनेंना 61,771 मते मिळाली आहेत. धंगेकर यांना एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत.