नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू, उरण – खरकोपर रेल्वे तसेच दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्धाटन करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने तयार केलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पत्रिका देताना त्यातून ठाकरे गटाचे खा. राजन विचारे यांचे नाव वगळले आहे. मुख्य म्हणजे यात केंद्रीय मंत्री, राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत रायगडचे खा. सुनील तटकरे व मावळचे खा. श्रीरंग बारणे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. असे असताना दिघा गाव रेल्वे स्थानक ज्यांच्या लोकसभा मतदार संघात येत असताना देखील खा. राजन विचारे यांचे नाव वगळण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकार आणि रेल्वे शासनाची विकृती असल्याची टीका खा. राजन विचारे यांनी केली आहे.
खासदार राजन विचारे यांना आज सकाळी १० वाजता निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली. स्थानिक खासदार राजन विचारे यांचे नाव वगळण्यात आल्याचे दिसून आले. खासदार राजन विचारे यांच्या लोकसभा मतदार संघात दिघागाव रेल्वे स्थानक व बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो येते. नियमाप्रमाणे स्थानिक लोक प्रतिनिधीचे नाव त्यात असणे आवश्यक असताना विचारे यांचे नाव वगळण्यात आल्याने यावरून आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दिघा गाव रेल्वे स्थानक व्हावे यासाठी खा. राजन विचारे यांनी देखील रेल्वे विभाग, केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी आंदोलन सह्यांची मोहीम राबवली होती. संसदेत प्रश्न विचारले होते असे विचारे यांनी सांगितले. शिंदे यांनी ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर त्यांच्या ठाणे जिल्ह्यातील सहकारी खा. वराजन विचारे हे अद्याप उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यातून विचारे हे शिंदे गटाला कायम आव्हान देत आलेले आहेत. अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळत आहेत.
दिघा गाव रेल्वे स्टेशनसाठी पाठवपुरवा केला होता. आता त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत माझे नाव टाकले गेले नसून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा यावर प्रश्न उपस्थित होत आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या सरकारला २०२४ मध्ये येणाऱ्या आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल.