संजय राऊतांना 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड ही ठोठावला (फोटो सौजन्य-X)
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टाने निकाल दिला असून हे प्रकरण 2022 सालचा आहे. मीरा भाईंदर टॉयलेट प्रकरणी मेधा सोमय्यांवर संजय राऊत यांनी आरोप केले होते.
मीरा भाईंदरमधील टॉयलेट घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने राखून ठेवला होता. या निकालाची आज (26 सप्टेंबर) सुनावणी पार पडली असून न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजार रुपये दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. संजय राऊत यांना उच्च न्यायालयात हजर राहावे लागेल, त्यानंतर ते तुरुंगवासाची शिक्षा कमी करण्याची विनंती करू शकतात.
न्यायालयाच्या सुनावणीनंतर मेधा सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया, आजही भारतीय न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभुणे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानत. माझ्या कुटुंबावर , माझ्या मुलावर कोणी आँच आणायचा प्रयत्न केला तरी एक सामान्य गृहिणी कशी लढेल, तशीच मी लढले. न्यायालयाने मला योग्य न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे. शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला यामुळे चाप बसेल, अशी प्रतिक्रिया मेधा सोमय्या यांनी व्यक्त केली.
मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. संजय राऊत यांना यापूर्वीच बदनामी आणि मानहानीची नोटीस बजावण्यात आली असून मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी एक रुपयाचा घोटाळा केला आहे आणि केवळ भीतीपोटी, त्यांची बदनामी करण्यासाठी एक रुपयाच्या घोटाळ्याचे पुरावे/कागदपत्रे नष्ट केली आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.