अक्षय फाटक , पुणे : गेल्या दोन वर्षात पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या भोंगळ कारभाराचे इतिहासात प्रथमच इतके वाभाडे निघालेले असताना देखील एक मजेदार किस्सा पुन्हा घडला अन् वाहतूक पोलिसांना त्या तरुणाला १ हजार २० रुपये स्वत:चे खर्च करून गावी पाठवावे लागले( Student Protest By Sleeping On Street Against Pune Traffic Police) त्यामुळे पोलिसांचे हशेझालेच पण, पुन्हा इभ्रत चव्हाट्यावर आली. सतत होणाऱ्या या सावळ्या गोंधळानंतर देखील वाहतूक विभाग जागेवर आलेला पाहिला मिळत नाही. याबाबत वरिष्ठांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या चर्चा देखील पोलीस दलात रंगलेल्या असतात. त्या वेगळ्याच!
पुणेकरांची दिवाळीनिमित्त खरेदीला झुंबड उडाली आहे. परिणामी शहराचा मध्यभाग सायंकाळनंतर ठप्प झाल्याचे पाहिला मिळतो. शहरात सध्या पाऊस देखील सुरू आहे. त्यात दिवाळीची खरेदी आणि गावी जाण्यासाठीची धामधूम यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुपारपासूनच गर्दी होण्यास सुरूवात होते. पण, पोलीस वाहतूक नियंत्रण सोडून कारवाईवरच लक्ष इमाने इतबारे देतात. आता त्यातही गम्मत म्हणजे, कर्मचाऱ्यांची काहीच चूक नसल्याची खाजगीत चर्चा असते. आदेशच तसे आहेत, असेही काही कर्मचारी सहज बोलून जातात.
काय घडला किस्सा?
सोमवारी घडलेला निषेध आंदोलनाचा किस्सा तर पुणेकरांनी घरा-घरात अन् चौकात चवीने चर्चिला. कारण आंदोलनही तशाच रितीने झाले. गावी जाण्यासाठी निघालेल्या राहूल धोंडे या तरुणाची दुचाकी वाहतूक पोलिसांनी अलका चौकात कुमठेकर रस्त्यावर (नेहमी उभे राहून गाड्या अडविण्याचे ठिकाण) अडविली. त्याच्या गाडीवर २०१९ पासूनचा दंड होता. (शहरात एखादं-दुसरीच दुचाकी विना दंडाची असेल) तो भरण्याचा हट्ट पोलिसांनी धरला. राहूल त्यांना माझी ट्रेन सव्वा तीन वाजता आहे. मी साडे चार महिन्यांनंतर गावी जातोय. मला जाऊ द्या म्हणून विनंत्या देखील करत होता. पण वाहतूक पोलिसांनी त्याच काही मनावर घेतल नाही आणि त्याची ट्रेन मिस झाली.
मग, मात्र राहूलचा त्रागा झाला आणि त्याने वाहतूक पोलिसांच्या निषेधार्थ चौकातच झोपून आंदोलनाला सुरूवात केली. त्याच आंदोलन इतक यशस्वी ठरल की वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. धावत पळत येऊन पोलिसांना राहुलला समजावण्याची वेळ आली. तोपर्यंत आंदोलनाची धग शहरात पोहचली होती. माध्यमांनी त्याची दखल घेत या आंदोलनाला प्रसिद्धी दिली. वाहतूक पोलीस विनंत्या करूनही राहूल काही आंदोलन सोडण्यास तयार नव्हता. पण, कसबस करून त्याच आंदोलन शांत करण्यात पोलिसांना काही वेळाने यश आले. पोलिसांनी त्याला शांत करत पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याची समजूत काढून त्याला रिक्षातून पुणे स्टेशन परिसरात नेले. स्वत:चे १ हजार २० रुपये खर्च करून त्याला ट्रॅव्हल्सने गावी पाठविले अन् मग पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर चहूबाजूंनी टिकास्त्र
या सर्व घटनानंतर मात्र पोलिसांवर चहूबाजूंनी टिकास्त्र सुरू झाले असून, पोलिसांच्या दंड वसूली व कारवाईच्या निषेधाला आणखी जोर धरला आहे. आता वरिष्ठांनी नुकतेच आदेश दिल्यानंतर देखील पोलीस वाहतूक नियमन सोडून कारवाई कशी करत होते, असाही प्रश्न यानिमित्ताने पोलीस दलात विचारला जात असून, त्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढे काय होते, हे पाहणे आवश्यक आहे.






