संग्रहित फोटो
पुणे : पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या २०२५-२६ च्या हंगामात १५ साखर कारखान्यांकडून १ कोटी ६७ लाख १८ हजार मेट्रिक टन इतके ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती साखर आयुक्त संजय कोलते यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली. पुणे जिल्ह्यात गेल्यावर्षी २०२४-२५ मध्ये सुमारे १ कोटी १४ लाख ४६ हजार मेट्रिक टनाइतके ऊस गाळप कारखान्यांनी पूर्ण केले होते. याचा विचार करता गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे ५३ लाख मेट्रिक टनांनी ऊस गाळप वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यंदा १.६७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप अपेक्षित
पुणे जिल्ह्यात गतवर्षी बंद असलेला अनुराज शुगर्स हा खाजगी कारखाना यंदाचा ऊस गाळप हंगाम घेणार आहे. त्यामुळे चालू वर्षी ९ सहकारी व ६ खाजगी मिळून १५ साखर कारखाने सुरू राहतील आणि या कारखान्यांकडून ऊस गाळप परवान्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता सुमारे १ लाख ४ हजार ५०० मेट्रिक टनाइतकी आहे. याचा विचार करता १६० दिवस साखर कारखान्यांचा हंगाम सुरू राहू शकतो. म्हणजेच १५ एप्रिलपर्यंत कारखाने सुरू राहतील.
पावसामुळे ऊस तोडणीस होणार विलंब
राज्यात दिनांक १ नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झालेला आहे. मात्र, सध्या पावसाची हजेरी कायम असल्याने ऊस तोडणीस विलंब होण्याचीच दाट शक्यता आहे. कारण शेतामध्ये चिखल असल्याने कामगारांनाही ऊस तोडणी अडचणीची आहे. शिवाय ट्रॅक्टर व अन्य वाहनांद्वारे वाहतूक करणेही कठीण आहे. त्यामुळे पावसाची पूर्ण उघडीप झाल्याशिवाय ऊस तोडणीस गती येण्याची शक्यता सध्या दिसत नाही. शिवाय कारखान्यांना अद्याप साखर आयुक्तालयाकडून यंदाचा ऊस गाळप परवानाही वितरण होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.






