कोल्हापूर – माजी आमदारांनी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी गुन्हा केला आहे. त्याबद्दल त्यांना अटक (Arrest) करण्यात यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने (Shivsena) शनिवारी लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
कोल्हापूरमध्ये (Kolhapur) वाढदिवसानिमित्त (Birthday) गुन्हेगारीला चालना देण्याचे, दहशत माजवण्याचे काम राजेश क्षीरसागर यांनी केल्याचे दिसून येत आहे. शहरात बेकायदेशीर फलक लागले असून त्यावर गुन्हेगारांची प्रतिमा आहे. वाढदिवसाला राजेश क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते धारदार तलवारीने केक कापत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. त्यामुळे भारतीय हत्या अधिनियम कायदा प्रमाणे त्यांनी गुन्हा केलेला आहे. तलवारीसारखे शस्त्र बाळगणे शिक्षेस पात्र ठरते, असे निवेदनात नमूद केले आहे.
बेकायदेशीर फलक लावून महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याप्रमाणे गुन्हा केला आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावर राजेश क्षीरसागर काय म्हणाले,
बिनपरवाने हत्यार वापरून आम्ही खून, मारामारी केली नाही. मी आजवर अनेकांचे प्राण वाचवले आहेत. सर्वसामान्यांना वैद्यकीय मदत दिली आहे. पण चांदीची तलवार माझ्या संग्रही आहे. त्या तलवारीने केक कापला आहे, असेही त्यांनी सांगितले.