विदर्भात नागपूर सर्वात 'कूल'
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा उन्ह तर सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे. असे असताना नागपुरात सकाळच्या वातावरणातील गारवा चांगलाच वाढत आहे. किंबहुना विक्रमाकडे पुढे जात असल्याचे चित्र आहे. हवामान खात्यानुसार, विदर्भात नागपूरची बुधवारी सर्वाधिक थंड शहर म्हणून नोंद झाली. या मोसमातील सर्वाधिक कमी ८ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते.
गेल्या चार दिवसांपासून पारा किमान पातळी गाठत आहे. त्यामुळे नागपूरकर जॅकेट, स्वेटरबंद झाले आहेत. कमाल तापमान २९-३० दरम्यान असल्याने दुपारी नागरिकांना किंचित दिलासा मिळत असला तरी सायंकाळी थंडीत वाढ होत असल्याने शेकोट्याही दिसत आहे. नागपूरनंतर गोंदिया ८.४ अंशासह दुसऱ्या तर यवतमाळ ८.८ अंशासह तिसरे थंड शहर ठरले. गेल्यावर्षी १४ डिसेंबरला ७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. त्यामुळे आजची तारीख लक्षात घेता थंडीने गेल्यावर्षीचा विक्रम मोडित काढण्याकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत थंडीची लाट; तापमानाचा पारा 0°C पर्यंत घसरला
डिसेंबरच्या शेवटी तापमान ७ ते ८० अंश सेल्सिअस असते. ३० डिसेंबर २०१८ रोजी नागपूरचे तापमान ३.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, जे मागील ५० वर्षांतील सर्वात कमी तापमान होते. परंतु, यंदा डिसेंबरच्या सुरुवातीलाच किमान तापमान ८ पोहोचल्याने अंशांपर्यंत नागपूरकरांमध्ये हुडहुडी भरली आहे. बुधवारी दिवसाला थोडे उन्ह तापले. त्यामुळे कमाल तापमान बुधवारी ३०.२ अंशापर्यंत गेले. मात्र, सायंकाळ होताच पुन्हा थंडीने जोर धरला.
रात्री घरातून बाहेर पडणे झाले कठीण
थंडीमुळे नागरिकांचे घरातून निघणेही बंद झाले. घरांमध्ये नागरिकांनी हिटरचा वापर सुरू केला. त्यातही स्वेटर, मफलर, टोपऱ्यांमध्ये अनेकांनी स्वतःला बंद करून घेतली. सायंकाळनंतर शहरातील विविध चौकांमध्ये, ऑटो स्टँडवर नागरिक शेकोटीजवळ हात शेकताना दिसून आले.
गारठा आणखीन वाढण्याचा अंदाज
देशातील अनेक भागात वातावरण बदल झाला असून, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचे ढग यापूर्वी होते. त्यातच राज्यात तीन ते चार दिवसांत गारठा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पाऊस इतका जोरदार सुरू झाला आहे की, मागील सर्व विक्रम मोडले आहेत. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण वाढत आहे. सरासरी एक्यूआय ३०४ वर आहे, अनेक ठिकाणी ४०० च्या जवळपास नोंद झाल्याचे पाहिला मिळाले.






