कुडाळ : इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालयात प्रा. नितिन बानगुडे पाटील यांच्या सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेसचे अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, श्रेया परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, रमाकांत ताम्हणेकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, बबन बोभाटे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला प्रा. बानगुडे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना बानगुडे पाटील म्हणाले की, आज शिवप्रभुंनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. राष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी शिवप्रभूंच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राची आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवप्रभुंनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म कायम ठेवला. या राज्यात मराठी माणसाला स्वाभिमान दिला. आज पुन्हा एकदा राष्ट्राला याच महाराष्ट्राची गरज आहे. आज सुरू असलेल्या हुकुमशाहीला सुरूंग याच महाराष्ट्रातून लागणार आहे. हा सुरूंग शिवसेनाच लावणार आहे. गेल्या दीड वर्षात राजकारणातील पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. या राजकारणाला दृष्ट लागली आहे. अनैतिकतेच्या पायावर हे राजकारण उभे आहे. आज मतपेट्या मतदार नाही तर पक्षच पळवून नेला आहे असे बानगुडे पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, हे सरकार पुन्हा निवडून आले तर शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स सुरू होईल. अबकी बार ४०० पारचा नारा हा कशासाठी तर, त्यांना संविधान बदलायचे आहे. त्यांना विरोधी पक्षच नको आहे. हे आम्ही नाही तर यांचेच खासदार सांगत आहेत. नैतिक मूल्ये राहिलेली नाहीत, तिथे राज्यव्यवस्था न राहता तेथे जंगलचा कायदा होतो. त्यामुळे येथे नागरिक नाहीतर गुलाम तयार होतात. आम्हाला गुलाम बनायचे नाही. त्यामुळे यावेळी सुद्धा विनायक राऊत यांना बहुसंख्यमताने खासदार म्हणून जिंकून द्यायचे आहे. म्हणजेच येणारी निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे, असे वक्तव्य प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सभेत मोदींना मते द्या, परंतु नारायण राणेंसाठी मते मागण्याची हिम्मत झाली नाही. लोकांचे पैसे बुडवणारे विविध प्रकारचे प्रकल्प आणले ३४ वर्षे सतत सत्तेत असताना उच्च पदावर असताना काही न करणारे नारायण राणे अजुनही संधी मागत आहेत. या निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव व खा. विनायक राऊत यांचा तिसरा विजय अशी डबल हॅट्ट्रिक होणार आहे. सरकारी कार्यालयात ३५ लाख कर्मचारी पदे रिक्त आहेत व तेच लोक बेरोजगारांना रोजगाराची स्वप्न दाखवत आहेत. केंद्र सरकारच्या लघु व सुक्ष्म विभागाचे करोडो रूपयांचे बजेट असताना एकही प्रकल्प जिल्ह्यात आणला नाही. या निवडणुकीत हिंदू या नावाने मते न मागता विकासाच्या नावाने मते मागा. यावेळी बोलताना आ. वैभव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली शिवसेना फोडली. जी शिवसेना महाराष्ट्राला दिलेल्या वचनांची पूर्तता करून पुढे जात होती. पाचपैकी एक सरस मुख्यमंत्री देणारी शिवसेना होती. हीच मोठी पोटदुखी ठरत होती. जोपर्यंत सेना संपवता येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आपल्या ताब्यात येणार नाही. शिवसेना संपवता येत नाही तोपर्यंत एकहाती सत्ता महाराष्ट्रात मिळणार नाही यासाठीच हे डावपेच आखले गेले. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेली फळी आजही तशीच मजबुत आहे.
भाजप ४०० पारचा नारा अशासाठी लावत आहे की, त्यांना आता देशाचे संविधानच बदलायचे आहे. मात्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्याला टिकवायची आहे. गेल्या दहा वर्षांत १५० कोटींचे कर्ज देशाने घेतले. मग विकास कुठे आहे? अशाने देश दिवाळखोरीत जाईल. आता देशाचे सजग नागरिक म्हणून ही लोकशाही टिकवायची आहे. देशात ४३ लाख मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेल्या. मात्र, आज दारूतून मिळणाऱ्या उत्पन्नातून घट झाली. यावर अभ्यासगट नेमला जातो. मात्र, मुलीच्या शिक्षणासाठी नाही. आज देशात हुकुमशाहीमुळे सुशिक्षित मतदार मतदानापासून लांब जात आहे. देशाला समर्थ बनवायचे असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी लोक सेतू उभारू या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ही निवडणूक राष्ट्राचा, सर्व सामान्य जनतेचा भविष्यकाळ सांगणारी ही निवडणूक आहे.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की, शिवसेना कोणाची म्हणणाऱ्यांना ही उत्तम उपस्थिती उत्तर आहे. आज ज्यांनी काम केले नाही ते ही वस्तुस्थिती लपविण्यासाठी केवळ जाहिरातबाजी करत आहेत. गेल्या दहा वर्षांत राऊत यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. माणगावमधील हत्तीप्रश्न, शासकीय मेडीकल कॉलेज असे अनेक विषय सोडवताना ते आमिषांना बळी पडले नाही. हेच सर्व सामान्य जनतेवरील त्यांचे प्रेम आहे. जे पहिल्या यादीत असायचे त्यांचे नाव आज उमेदवारीच्या तेराव्या यादीत गेले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांची कारकीर्द कुठे गेली हे यावरून कळते. जे आपल्या मुलांना सुसंस्कृत समजत आहेत. त्याचा सुसंस्कृतपणा चिपळूणमधील सभेत दिसला. त्या़च्या नसानसात गुंडगिरीच भरलेली आहे. आपल्याही मंत्री पदाची आमिषे होती. पण पण लोकांनी आपल्याला आमदार केले आहे त्यांचा अपेक्षाभंग करायचा नसल्याने शेवटपर्यंत निष्ठावंतच राहिलो, असे ते म्हणाले.